Tuesday, 18 June 2013

तरुण आणि राजकारण

तरुण आणि राजकारण...!!


देशाच्या एकूणच जडणघडणीत आणि विकासात तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असते. देशाच्या सामाजिक, सार्वजनिक आणि राजकीय जीवनाबद्दल, घटनेबद्दल तरुणांचे काय मत आहे, हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते. समकालीन व्यामिश्र पेचप्रसंगात देशात बदल किंवा क्रांती घडवून आणण्याचे काम तरुणच करू शकतो यावर नागरी समाजाचा विश्वास असतो. अनेक देशांतील क्रांतीमधील सहभाग, स्वातंत्र्य आंदोलनातील आणि स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक सामाजिक चळवळीतील सक्रिय सहभागातून तरुणांनी आपली कार्यक्षमता दाखवून दिली आहे. अलीकडले उदाहरण म्हणजे अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात तरुणांचा सक्रिय सहभाग दिसून आला. फेसबुकवरून अण्णांचे आंदोलन तरुणांनीच चालवले. तरुण वर्ग आज भूमिका घेण्याच्या मनःस्थितीत दिसतो आहे. देशातील भ्रष्ट प्रवृत्तीविरुद्ध आवाज उठविणार्‍या अराजकीय नेतृत्वाकडे जसा तो आकर्षित होतो, तसाच तो नव्याने राजकारणात येणार्‍या नेतृत्वाकडेदेखील आकर्षित होताना दिसतो. आयटी क्षेत्रातील तरुण-तरुणी राहुल गांधींचा फोटो कॉम्प्युटर स्क्रीनवर ठेवताना दिसतात, तर स्पर्धा परीक्षेतील अनेक तरुण किरण बेदी, विश्वास नांगरे-पाटील, महेश भागवत, टी. चंद्रशेखर इ. प्रमाणेच राहुल गांधींनाही आयडॉल मानतात. उत्तर प्रदेशात राहुल बरोबरच आता अखिलेश यादवांकडे तरुण आकर्षित झालेले दिसतात. तर महाराष्ट्रात ‘लेक वाचवा’ अभियानातून सुप्रिया सुळे घराघरात पोहोचताना दिसते. जशी गर्दी राहुलच्या प्रचार सभांना होते तशीच गर्दी महाराष्ट्रात राज ठाकरेंच्या सभांना होताना दिसते. प्रचारसभा, त्याचे नियोजन, विविध आंदोलनातील तरुणांचा सहभाग जसा वाढू लागला तसा तो मतदानासाठीदेखील बाहेर पडू लागला. राजकारण भ्रष्ट झाले आहे आणि त्यात सुधारणा झाल्या पाहिजेत हे तरुणांना मान्य आहे. परंतु भ्रष्ट राजकारणाचे निर्मुलन स्वतः राजकारणात उतरून करणे तरुणांना मान्य नाही. तो स्वतः सक्रियपणे राजकारणात उतरताना दिसत नाही. राजकारणाकडे करिअर, एक व्यवसाय म्हणून पाहताना तो दिसत नाही. हे दिसून आले आहे सीएसडीएसच्या देशव्यापी अभ्यासातून.

तरुणांच्या राजकीय मतांचा अभ्यास
दिल्लीच्या सीएसडीएस- लोकनीती संशोधन टीमने तरुणांच्या राजकीय मतांचा मागील वर्षी अभ्यास केला. त्यासाठी नमुना निवड पद्धतीने देशभरातील तरुणांच्या मतांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरी-ग्रामीण, तरुण-तरुणी आणि सर्व जात-धर्म-वर्गाचे पुरेसे प्रतिनिधित्व समाविष्ट करून तरुणांची सर्वव्यापक मते नोंदवण्याचा प्रयत्न अभ्यासगटाने केला. तरुणांचा अभ्यास करताना अभ्यास गटाने तरुणांची व्याख्या निश्चित केली. ‘तरुण’ म्हणजे कोण? विचाराने, मनाने की वयाने तरुण? कोणत्याही वयात सार्वजनिक जीवनात सक्रिय असणार्‍या व्यक्तीस विचाराने किंवा मनाने तरुण व्यक्ती अशी व्यापक व्याख्या तरुणांची केली जाते. परंतु या अभ्यासात वयाचा विचार केला आहे. सर्वसाधारणतः १३ ते ३५ वयोगटातील मुला-मुलींना तरुण-तरुणी म्हटले जाते. संविधानात्मकदृष्ट्या १८ वर्षे पूर्ण करणार्‍या तरुण-तरुणींना मतदानाचा हक्क दिला आहे. त्यामुळे अभ्यासामध्ये १८ ते ३३ वर्षे वयोगट निवडला आहे. या वयोगटातील तरुणांचा वर्गही दोन भागांमध्ये विभागला जातो. एक १८ ते २५ वयातील तर दुसरा २६ ते ३३ वयोगटातील तरुण होय. या दुसर्‍या गटातील तरुणांचं मत हे पहिल्या वयोगटापेक्षा वेगळं असतं. अभ्यासात तरुण नेतृत्वाच्या व्याख्येत मात्र २५ ते ४० वयोगटातील व्यक्तींचा समावेश केला आहे. २०११ च्या जनगणनेनुसार भारतातील तरुणांची संख्या एकूण लोकसंख्येच्या १/५ आहे. २०२० पर्यंत भारताचे सरासरी वय २९ वर्षे होईल. त्यामुळे तरुणांच्या अभ्यासाचे वेगळेच महत्त्व आहे.
तरुणांचा अभ्यास करण्यामागे उद्देश असा होता की सध्याचा तरुण आणि इतर वर्ग राजकीय घडामोडींबाबत किती जागरूक आहेत, ते राजकीय स्वरूपाची चर्चा किती करतात, राजकीय सहभाग आणि राजकीय आवडी कशा आहेत, निवडणूक प्रक्रियेमध्ये त्यांचा स्वाभाविक कल कोणाकडे असतो, राजकारणाचा करिअर म्हणून तरुण कसा विचार करतो इत्यादी गोष्टी जाणून घेणे. अनेक घटकांआधारे तरुणांच्या राजकीय मतांचा अभ्यास करण्यात आला. त्यातील राजकीय जागृतता, राजकीय आवड, राजकीय सहभाग, पक्ष पसंती, निवडणूक सुधारणा आणि राजकीय करिअर या सहा घटकांबाबत तरुणांचे काय मत आहे याचा आपण इथे विचार करू.

राजकीय जागृती-
राजकारण, राजकीय घटनांबाबत तरुण किती जागरूक आहेत किंवा राजकीय घटनांबाबत किती माहिती ठेवतात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यास असे आढळून आले की, ३१ टक्के तरुण राजकीय दृष्ट्या जागृत नाहीत. ६९ टक्के तरुण राजकारणासंदर्भात जागृत आढळून आले. त्या ६९ टक्के तरुणांपैकी २० टक्के तरुण अधिक जागृत तर ४९ टक्के तरुण राजकारणासंदर्भात मर्यादित प्रमाणात माहिती बाळगतात तर केवळ १५% जुन्या लोकांमध्ये राजकारणाबाबत अधिक जनजागृती दिसते. १८ ते २५ वयोगटातील २३ टक्के तरुणांमध्ये अधिक राजकीय जागृतता दिसते तर २६ ते ३३ वयोगटामध्ये १८ टक्के तरुण राजकीय घडामोडींबाबत सजग असतात. यातून वयोगटातील जागृततेची वाढ आणि घट स्पष्ट दिसते. राजकीयदृष्ट्या ग्रामीण भागातील तरुणांपेक्षा शहरी तरुण अधिक सजग दिसतात. तरुण-तरुणींचा विचार केला तर तरुणींच्या तुलनेत तरुण अधिक जागृत दिसतात. ग्रामीण तरुणींच्या तुलनेत शहरी तरुणी अधिक सजग दिसते. सामान्यतः शहरी मध्यम आणि उच्च स्तरातील महिला राजकारणात सक्रिय दिसतात. शिक्षण व प्रसारमाध्यमांमुळे महिलांची मते आता व्यक्त होऊ लागली आहेत. परंतु त्या राजकीय जगाला आव्हान करताना दिसत नाहीत.

राजकीय आवड आणि सहभाग-
राजकारणाबाबतच्या आवडीसंदर्भात असे दिसून आले की ६२ टक्के तरुणांना राजकारणाची आवड आहे. त्यातील १० टक्के तरुणांना राजकारणाची अधिक आवड दिसून आली. ३४ टक्के तरुणांनी राजकारणाबाबत उत्साह दर्शवला नाही. ७६ टक्के तरुण पुरुष राजकारणात रस घेताना दिसतात तर ४५ टक्के तरुण स्त्रिया राजकारणात रस घेताना आढळून आल्या. यामध्ये शिक्षण आणि प्रसारमाध्यमेदेखील दोघांचा रेशो बरोबर करू शकत नाहीत. ७८ टक्के उच्चशिक्षित तरुण राजकारणात सहभाग घ्यायला उत्सुक आहेत तर निरक्षरांमध्ये ३५ टक्के तरुण राजकीय सहभागाबाबत उत्सुक आहेत. शिक्षणामुळे लोक राजकारणाकडे सकारात्मकदृष्ट्या पाहताना दिसतात. राजकारणात आवड असणार्‍या तरुणांचे प्रमाण अधिक दिसत असले तरी राजकारणात सहभाग घेणार्‍या तरुणांचे प्रमाण मात्र कमी दिसून आले.
राजकीय सहभाग तीन पातळ्यांवर मोजण्याचा प्रयत्न प्रस्तुत अभ्यासात करण्यात आला. एक म्हणजे मतदान प्रक्रियेतील सहभाग. १८ ते ३३ वयोगटातील तरुणांच्या मतदानाची टक्केवारी १९९६ ते २००९ सालच्या निवडणुकीदरम्यान ५८ टक्क्यांच्या मागेपुढे राहिलेली दिसते. त्यात तरुणांच्या तुलनेत तरुणींचे प्रमाण कमी दिसते. शिवाय शहरी तरुणांच्या मतदानाच्या तुलनेत ग्रामीण तरुणांचे मतदानात भाग घेण्याचे प्रमाण अधिक दिसते. राजकीय सहभागाची दुसरी पातळी म्हणजे निवडणूक संदर्भातील प्रक्रियामधील म्हणजेच पक्षाचे मेळावे-बैठका, प्रचारसभा, पत्रकं वाटप इत्यादींमधील सहभाग मोजण्याचा प्रयत्न सर्वेक्षणात करण्यात आला. या प्रक्रियेमध्ये सहभाग घेणार्‍यांचे प्रमाण कमी आढळून आले. निवडणूकसंबंधित कामांमध्ये शहरी तरुणांच्या तुलनेत ग्रामीण तरुण अधिक सहभाग घेताना आढळतात. तिसरी पातळी म्हणजे निषेध-निदर्शने मोर्चातील सहभाग तपासणे. सर्वेक्षणात आढळून आले, की केवळ १२ टक्के तरुण निषेध-निदर्शनात सहभाग घेतात. इतर म्हणजे ३४ वयोगटानंतरच्या लोकांमध्ये हे प्रमाण ११ टक्के दिसते. म्हणजे तरुण व इतरात या बाबतीत फरक नाही. शहरी तरुणांच्या तुलनेत ग्रामीण तरुण निषेध मोर्चात अधिक सहभाग घेताना दिसतात तर याउलट ग्रामीण तरुणींच्या तुलनेत शहरी तरुणी या कामात अधिक सक्रिय दिसून आल्या. राजकीय सहभागाच्या तिन्ही पातळ्यांचा विचार करता हे स्पष्ट होते की राजकारणाविषयीची आवड असणे वेगळे आणि त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणे वेगळे आहे. या दोन्ही भिन्न गोष्टी आहेत.

राजकीय कल-
तरुणांचे मत प्रत्येक राजकीय पक्षाला महत्त्वाचे वाटते आणि ते मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातात. या सर्वेक्षणात तरुणांचा राजकीय कल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तरुणांचा मतदानाचा पॅटर्न बदलताना दिसतो. कॉंग्रेसमागे उभे राहणारा तरुण नव्वदच्या दशकानंतर कॉंग्रेसबरोबर इतर पक्षांत विभागलेला दिसतो. कॉंग्रेसचा तरुण पाठीराखा कमी होण्यामागे भाजपचा व काही प्रादेशिक पक्षाचा उदय दिसतो. तरीही भाजपच्या तुलनेत कॉंग्रेसला मतं देणार्‍या तरुणांचे प्रमाण अधिक दिसते. विशेषतः २००४ व २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीत तरुणांचा कॉंग्रेसला अधिक पाठिंबा दिसतो, पण भाजपला मिळणार्‍या वरिष्ठ मतदारांच्या तुलनेत भाजपला तरुणांची अधिक मते मिळताना दिसतात. १९९८ व १९९९ सालच्या लोकसभा निवडणुकीनंतर भाजप सत्तेवर आला. या दोन्ही निवडणुकांत कॉंग्रेसपेक्षा तरुणांनी भाजपला अधिक मते दिलेली दिसतात. तरुणांना (विशेषतः विद्यापीठीय पातळीवरील) डाच्या विचारांचे आकर्षण असते. परंतु ते मतांमध्ये परिवर्तित होताना दितस नाहीत. उत्तरेकडील दलित तरुणांचा कल बसपाकडे दिसतो. तरुणांच्या तुलनेत तरुणींची मते कॉंग्रेसला अधिक मिळताना दिसतात. शहरी तरुणांचा कल भाजपकडे तर ग्रामीण तरुणांचा कल कॉंग्रेसकडे दिसतो.

निवडणूक सुधारणा-
या सर्वेक्षणात निवडणूक सुधारणासंदर्भात तरुणांमध्ये एकमत आढळून आले. निवडणूक पद्धतीमध्ये काही दोष असल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले. निवडणूक सुधारणासंदर्भात अनेक आयोगांचे अहवालही आले. अण्णा हजारेंच्या आंदोलनादरम्यानही निवडणूक सुधारणासंबंधी चर्चा झाली, या सर्वेक्षणात निवडणूक सुधारणासंदर्भात लोकप्रतिनिधींना परत बोलावण्याचा हक्क, सक्तीचे मतदान, उमेदवार नाकारण्याचा अधिकार आणि ६५ वर्षांवरील उमेदवारास निवडणूक लढवण्यापासून निर्बंध घालण्यासंदर्भातील मुद्द्यांचा समावेश होता. जनतेने पाच वर्षांसाठी निवडून दिलेला खासदार किंवा आमदार जनतेप्रती जबाबदार राहिला नसेल किंवा समाधानकारक कामगिरी नसेल तर त्याला मुदत संपण्याआधी परत बोलावण्यास (Right to Recall) ६९ टक्के तरुणांनी संमती दर्शवली आहे. मतदानाचे घटते प्रमाण लक्षात घेता सक्तीच्या मतदानाची चर्चा नेहमीच होते. या प्रश्नांसंदर्भात ६० टक्के तरुण सक्तीच्या मतदानाचे समर्थन करताना दिसतात. नको असलेला उमेदवार नाकारण्यासंदर्भात (Right ti Reject) ६० टक्के तरुण होकार देताना दिसतात. तर ६५ वर्षांपुढील उमेदवारांवर निवडणूक लढवण्यास निर्बंध घालण्यासंदर्भात ५० टक्के तरुण संमत दिसतात. निवडणूक सुधारणांच्या मुद्द्यांंसंदर्भात तरुणांप्रमाणेच ज्येष्ठांचाही मोठा पाठिंबा दिसतो. निवडणूक सुधारणांना कनिष्ठ व गरीब वर्गाच्या तुलनेत उच्च व मध्यम वर्गातील तरुणांचा अधिक पाठिंबा दिसून आला. पक्षीय पाठीराख्यांचा विचार केला तर कॉंग्रेसच्या पाठिराख्यांच्या तुलनेत डावे पक्ष व भाजपाचे समर्थक असलेले तरुण निवडणूक सुधारणांना अधिक पाठिंबा देताना दिसतात.
राजकारणात करिअर करण्यासंदर्भात ५४ टक्के तरुणांनी नकारार्थी उत्तर दिले तर ३४ टक्के तरुणांनी राजकारणात करिअर करण्याची इच्छा दर्शवली. ग्रामीण तरुण-तरुणींच्या तुलनेत शहरी तरुण-तरुणी अधिक इच्छुक दिसतात तर राजकारणात करिअर करू इच्छिणार्‍यात मध्यम वर्गातील युवकांचे प्रमाण अधिक दिसते. राजकारणाकडे करिअर म्हणून न पाहण्यामागे सर्वात मोठा अडथळा घराणेशाहीचा आहे. १५ व्या लोकसभेत निवडून आलेल्या तरुण खासदारात ६६ टक्के खासदारांना राजकीय पार्श्वभूमी आहे. हीच अवस्था महाराष्ट्रातील तरुण आमदारांबाबत दिसून येते. घराणेशाहीमुळे नवीन नेतृत्वास संधी मिळताना दिसत नाही.

तरुणांच्या अभ्यासावरून स्पष्ट होते की राजकारणाबाबतची तरुणांतील सजगता वाढत आहे, राजकारणाविषयी तरुणांना मोठ्या प्रमाणात आवड आहे. परंतु जबाबदारी घेण्यास युवक तयार नाहीत. राजकारणात बदल झाले पाहिजेत, निवडणूक पद्धतीत सुधारणा झाल्या पाहिजेत, पण स्वतः त्यात सहभाग घ्यायचा नाही, राजकारणाकडे 8करिअरचा एक पर्याय म्हणून पाहण्याची त्यांची तयारी नाही. हा विरोधाभास लोकशाहीस धोक्याचा असून तरुणातील हा दृष्टिकोन बदलण्याची आवश्यकता आहे.

2 comments: