Showing posts with label शिक्षण... Show all posts
Showing posts with label शिक्षण... Show all posts

Thursday, 25 July 2013

शिक्षण,शिक्षक व विद्यार्थी: एक चिंतन


शिक्षण,शिक्षक व विद्यार्थी: एक चिंतन

समाजाचे एकक आहे व्यक्ती, मानवप्राणी. या मानवप्राण्याचा बाल्यावस्थेतून प्रौढावस्था व नंतर वृद्धावस्था असा प्रवास होतो. बाल्यावस्थेत तो शिक्षण घेतो, प्रौढावस्थेत या शिक्षणाचा वापर करून अर्थार्जन करतो, समाजोपयोगी कार्ये करतो आणि वृद्धावस्थेत प्रौढावस्थेतील धन व मान-सन्मान या कमाईच्या आधारे मृत्युकडे वाटचाल करतो. वृद्धावस्थेत आपल्या अनुभवाचा वापर तो बालकांना शिक्षण व प्रौढांना मोलाचा सल्ला द्यायला करू शकतो. बालकाचा विकास प्रौढामध्ये करण्यासाठी पालक, शिक्षक व समाज या तीन घटकांचे सुसंवादी प्रयत्न आवश्यक असतात. या तिन्ही घटकांपैकी शिक्षकाची भुमिका विशेष महत्त्वाची असते. या तिन्ही घटकांमधला सुसंवाद अधीक सखोल करण्याचे कार्य शिक्षकाचे असते. या तिन्ही घटकांमधला परस्पर विश्वास या सुसंवादाची खोली ठरवतो. पण सध्याच्या काळात समाजात शिक्षकाविषय़ी बरेच नकारात्मक समज पसरू लागलेत.शिक्षकाच्या ज्ञानाविषयी, शिक्षक म्हणुन त्याच्या योग्यतेविषयी पालक व समाज अविश्वास व्यक्त करताहेत. या सर्व अविश्वासमय वतावरणामूळे शिक्षणाचा मुळ हेतूच हरवत चाललाय.

खरेतर शिक्षण व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवते. त्याला जगण्याला लायक बनवते. जगताना येणा-या समस्यांशी दोन हात करायला शिकवते. हे जर जमले तर उदरनिर्वाह आपोआप होतो. शिकवणारा शिक्षक शिक्षणाचा मुळ हेतू लक्षात घेऊन शिकवत असेल तर तो उत्तम शिक्षक म्हनवून घ्यायला पात्र असतो. असा उत्तम शिक्षक उत्तम विद्यार्थी घडवतो.

शिक्षणविषयक तक्रारींध्ये मोठी तक्रार आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांचा दर्जा घसरलाय, शिक्षणाचाच दर्जा घसरलाय. इतर तक्रारी अहेत त्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा नाही. नवनिर्मितीची क्षमता कमी आहे, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी-व्यवसायात वा समाजात थेट उपयोग होत नाही, शिक्षणाने बेरोजगारी दुर होत नाहीये इत्यादी. जशा तक्रारी जास्त आहेत , तसेच तक्रार करणारेही जास्त आहेत. येथे आठवते ती " हु मुव्ड माय चीझ?" ही कथा. बहुसंख्य तक्रार करणारे चीझ संपत आल्यानंतर निषेध करत, उपाय न शोधता उपासमारीने मरणार्‍या उंदरासारखे आहेत. फार दुर्मीळ प्रजाती आहे ती दुसर्‍या उंदराची. समस्येने खचून न जाता नवा मार्ग शोधणारी. याच दुर्लभ प्रजातीचा एक प्रतिनिधी हा लेख लिहितोय.

शिक्षक कोठे चुकले याची चिरफाड करण्याने शिक्षण सुधारणा होणार नाहीत. कारण चुकलंय ते शिक्षण. आग सोमेश्वरी लागली असेल तर उपाय रमेश्वराकडे करण्यासारखा प्रकार सध्या सुरू आहे. जर खरंच शिक्षणाविषयी तळमळ असेल तर शिक्षण कोठे चुकलॆ याचा प्रामाणिक, अभिनिवेशरहित, पुर्वग्रहरहित विचार व्हायला हवाय. आपल्या शिक्षणाचा असा खेळखंडोबा व्हायला कारण आहे ती आपण स्विकारलेली मेकॉलेची शिक्षण पद्धती. गुलाम राष्ट्राचे सांस्कृतिक व मानसीक खच्चीकरण करणा-या या पद्धतीचा विकास इंग्रज राज्यकर्त्यांना या देशावर पिढ्यानुपिढ्या राज्य करता यावे यासाठी केला गेला. देशाचा बौद्धीक विकास या पद्धतीचा हेतू कधी नव्हताच. बौद्धिक विकास घडवयचाच नसल्याने शिक्षकाला स्वबुद्धी वापरण्याची गरजच नव्हती. याचाच अर्थ शिक्षक बुद्धिमान हवा हा निकष कधी नव्हताच. म्हणुन या पद्धतीमुळे शिकवणे हे सोपे काम आहे असा समज बहुसंख्य शिक्षकांनी व इतर लोकांनी करून घेतला.

इंग्रजांनी लादलेल्या या शिक्षण पद्धतीचा मुळ उद्देश्य भारताचा कारभार हाकण्यासाठी पुरेशी लायकी असलेले मनुष्यबळ पुरवणे हाच होता. या खंडप्राय देशावर राज्य करायचे म्हणजे लिहिता वाचता येणार्‍यांची, हिशोब करू शकणा-र्‍यांची, आलेल्या आदेशांचा अर्थ लवून काम करू शकणार्‍यांची गरज होती. मेकॉलेने अशा गुलाम मनोवृत्तीच्या भारतीयांचे कारखाने ही शिक्षण-पद्धती वापरून निर्माण केले. या पद्धतीमध्ये बांधीव पाठ्यक्रम असतो. शिक्षक तो शिकवतो, शिकवल्यानंतर शिकणारा साचेबद्ध परिक्षा देतो. पाठांतरावर आधारीत प्रश्नांची जो अधिक अचुक- पुस्तकी- उत्तरे लिहीतो तो पास होतो. ज्याला पाठांतर व नंतर त्या पाठांतराचे लेखन जमत नाही तो मागे पडतो. कौशल्यविकास या पद्धतीत अपेक्षीत नाही. कारण कारकून वा कामगार जर स्वतंत्र बुद्धिने काम करु लागला तर ते सत्तेला जड जाते. साच्याचे कामगार घडवणारी ही यंत्रणा आपण स्वातंत्र्यानंतरही स्विकारली.

मेकॉलेच्या या पद्धतीत आवश्यक असणारे पाठांतर शिकवायला बुद्धी आवश्यक नसते. याच कारणाने ज्यांचे थोडेफार शिक्षण झाले आहे त्यांना शिक्षकांची नोकरी मिळवणे जड गेले नाही. पाठांतरच शिकवायचे असल्याने एकदा शिक्षक झाल्यावर ज्ञान वर्धनाची गरजच नव्हाती. या शिक्षकांना काम कमी असते त्याबद्ल्यात मोबदला मात्र बरा मिळतो. फावल्या वेळात वा कामाच्या वेळेत सुद्धा इतर व्यवसाय करून वरकमाई करता येते हे समाजाने बरोबर हेरले. मग याच स्वकार्यभाग साधाणार्‍या पुर्वसुरींच्या पावलांवर पाऊले टाकत डी. एड. करुन शिक्षक होऊन पाट्या टाकणार्‍यांची फळी तयार झाली. यांनी पाठांतरात तयार केलेले पुढे पदवीधर व त्यांच्यापुढचे द्विपदवीधर झाले. यांच्यातूनच माध्यमीक व महाविद्यालयीन शिक्षक घडले. सगळ्यांचा जोर पाठांतरावर. याच मंडळींनी मग पाठ्यक्रम घडवले. जे शिकवायला सोपे ते पाठ्यक्रमात सामील झाले. यातच व्यावसायीक अभ्यासक्रमांना महत्त्व आले. त्यांच्या प्रवेशासाठी गुणवाता जोखण्याचा मार्ग होता गुणपत्रक. अधिक गुण -प्रवेशाची व उत्तम भविष्याची खात्री. या समीकरणाने गुणांचे कारखाने उघडले ( वाचा लातूर पॅटर्न व कोचींग क्लासेस). कौशल्या विकास येथेच संपला. संकल्पना समजणे मागे पडले. ही आजची पिढी आहे. स्वतंत्र विचार
सलेली पिढी.

यावर उपाय काय? शिक्षक निवड करताना ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रज्ञा आहे त्यांचीच निवड शिक्षक म्हणुन करा. शिक्षक अत्त्युत्तम असेल तरच तो उत्तम विद्यार्थी घडवतो. म्हणुन त्यांच्या निवडीसाठी पारदर्शक प्रक्रिया विकसित करा. वस्तुनिष्ठ चाळणी परिक्षा जी या भावी शिक्षकांच्या विषयज्ञान, शिकवण्याची व शिकण्याची इच्छा, आकलनक्षमता, शिक्षणप्रक्रियेचे ज्ञान, नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्याची क्षमता, पडताळले जावे. यानंतर प्रत्यक्ष वर्गावर शिकवायला लावून शिकण्याचे कौशल्या जोखले जावे. या प्रक्रियेमधुन ताऊन सुलाखून बाहेर पडणारे हे शिक्षक संख्येने कमी असतील. असुदेत. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभ असाच मंद असतो. या संख्येने कमी असलेल्या लायक शिक्षकांना शिक्षणाचा मुळ उद्देश शिकवा. कौशल्ये शिकवण्याचे स्वातंत्र्य व सृजनात्मक शिक्षणपद्धती विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन द्या. हे केल्याबद्दल मान-सन्मान द्या. मग इतरांना त्यांचे अनुकरण करण्याची उर्मी येईल. कौशल्य शिकवणा-या शिक्षकांची संख्या वाढेल. आणि हा बदल कालपरत्वे पुढे झिरपत जाईल.

मुळापासून सुधारणा करणे गरजेचे आहे. फक्त टिका करणे सोपे असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्याला शिकण्याची द्रुष्टी आलीली असते. पण नसतो तो अनुभव. शिक्षण अमर्याद आहे. यातील काय शिकावे व कसे शिकावे यासाठी प्राध्यापक असतो. तो शिक्षकच असतो. ब-याचदा विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतात. शिक्षकाकडे जास्त असतो तो अनुभव. विषयातला तर असतोच त्याबरोबर विषायाशी संलग्न पण पुस्तकात नसलेल्या ब-याच संकल्पना त्याला अनुअभवाने उमगलेल्या असतात. विषयाचा वापर जगण्यासाठी कसा अरावा यचे ज्ञान त्याला आलेले असते. यामुळे तो शिकवू शकतो कसे शिकावे? असा प्राध्यापक पाठ्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी त्याच्या मगदुराप्रमाणे हे अमर्याद शिक्षण जितके जास्त परिणाकारकपणे घेता येइल तितके घेतो. त्याने मिळवलेल्या कौशल्यांची प्राध्यापक पडताळणी करतो. त्रूटी दुर करतो. आणखी काय करता येईल याचे जाण देतो. त्याला माहीती असते प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. प्रत्येकाला वेगळ्या मर्गदर्शनाची, वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्याची गरज असते. त्याच्या मार्गदर्शनाखाली य विद्यार्थ्याची उत्क्रांती पुढच्या पिढ्या घडवणार्‍या शिक्षकामध्ये होते. पाठांतराधारीत परिक्षा या प्रक्रियेला गर्भातच मारतात. प्राध्यापक जिर्ण शिर्ण नोटस मधुन शिकवतो. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळावेत म्हणुन त्यांना नोट्स झेरॉक्स करून देतो. महत्त्वाचे प्रश्न सांगतो. अभ्यासक्रमाची झापडे लावतो. कायद्यांचा लावावा तसा पाठ्यक्रमाचा शब्द्च्छल करणारा अर्थ लावून तेव्हढेच घटवून घेतो व छापाचे सुबक गणपती घडवतो. हे छापाचे गणपती पदव्यांच्या पुंगळ्या व मेडलं मिरवत, जगण्याच्या बाजारात ठेचकाळायला व प्राध्यापकाला व शिक्षणालाच दोष द्यायला बाहेर पडतात. दोष मुळातून सुधारायला हवेत. पाठांतराधारीत परिक्षा बंद करून कौशल्याधारीत परिक्षा यायला हव्यात.

काही वेळेस साध्या साध्या गोष्टी समजायला अवघड जातात. अनेक शिक्षकांना सुद्धा कौशल्यविकास करायचा म्हणजे काय हे समजत नाही. उष्णतेने घनपदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतली की त्यांचे आकुंचन होते. ही झाली माहिती. एखाद्या भांड्याचे झाकण उघडत नसेल तर भांडे थंड करावे अथवा झाकण तापवावे हे झाले ज्ञान. त्याचा व्यवहारात वापर करून भांडे उघडणे हे झाले कौशल्य. वाचता येणे हे कौशल्य आहे. लिहिता येणे हे कौशल्य आहे. निबंध लिहीणे हे भाषीक कौशल्य आहे. आपण निबंध लेखणाचे काय केले? परिक्षेत गुण मिळावेत म्हणुन आपण निबंध पाठांतर करायला शिकवले. अनेक शिक्षक तर निबंधाच्या पुस्तकातून निबंध उतरवून आणायला सांगतात. काही शिक्षक निबंध फळ्यावर लिहुन देतात. विद्यार्थी त्यांच्या गृहपाठाच्या वहीत( या वहीला कव्हर असावे लागते, अक्षर चांगले असावे लागते, लिहिण्यातला निटनेटकेपण महत्त्वाचा असतो) हा निबंध घरून पक्का लिहून आणतात. तो दोनदा त्यांच्या हाताखालून जातो. तपासताना शिक्षकाला एक नजर टकून तपासता येतो, निबंध पुस्तकातला घेऊन जसाच्या तसा लिहिलेला असल्याने मजकुराची , भाषेची, विचारमांडणीची तपासणी करावी लागत नाही वेळ वाचतो. विद्यार्थ्याला परिक्षेत गुण मिळतात पण निबंधलेखन कौशल्याचे काय? गुणांना महत्त्व दिल्याने शिक्षकाचा भाषीक कौशल्य शिकवण्याचा अवघड खटाटोप वाचला.

गणितात तर आणखीच गंमत आहे. त्रिकोणमीतीचे काय करायचे याचे कोणालाच काही कळत नाही. क्षेत्रफळ काढणे पुस्तकातले वेगळे व व्यवहारातले वेगळे बनून जाते. हे विषय वर्गात शिकवण्याबरोबरच निसर्गात नेऊन शिकवावा लागतो. तोच प्रकार वनस्पती वा प्राणी शास्त्राचा. वनस्पतींचे विविध भाग शिक्षक विद्यार्थ्यांना वर्षातुन एकदा दाखवतो तेही बहुद्धा चित्रांच्या सहाय्याने. तो मुलांना त्याच्या पाहण्यातली उदाहरणे देतच नाही. पुस्तकातल्या बटाट्याचे डोळे पाहून विद्यार्थ्याला काही कळतच नाही. घरी जाऊन बटाटा बघायला कोणी शिकवतच नाही. बटाट्याच्या फोडी मातीत लावून डोळ्यांचे अंकुरणे अनुभवण्याचे तर दूरच. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. माझ्या एका सहका-याच्या मुलाने " होळी" या विषयावर फळ्यावरचा निबंध न लिहीता स्वतःच्या मनाने लिहिला म्हणुन त्याच्या शिक्षकाने त्याची निबंधवही भर वर्गात फेकुन दिल्याचे आठवते. या विद्यार्थ्यावर काय संस्कार झाले असतील? तो जर संवेदनशील असेल तर आयुष्यभर आता स्वतःचे विचार मांडू शकणार नाही. हे शिक्षकाने क केले असेल तर प्रत्येक मुलाला निबंधाचे गुण मिळावेत म्हणून.

गुणाधारीत मुल्यांकन चुकीचेच आहे. गुण या शब्दाच्या मुळ अर्थाचा विचार व्हावा. विद्यार्थी गुणवंत म्हणजे फक्त मार्क्सने नसावा तर त्याला त्याच्या वयाला अपेक्षीत कौशल्ये आत्मसात असावीत. गुणाधारीत मुल्यांकन बंद करा. कौशल्यांचा विकास व जोपासना करा तरच शिक्षण अर्थपुर्ण होईल. विद्यार्थ्याला शिक्षणाचा खरा फायदा तेव्हाच होईल.

Tuesday, 2 July 2013

विद्यार्थ्यांसाठी मनोगत..


विद्यार्थी
मित्र-मैत्रीसाठी एक मनोगत


(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या - वाचून त्याचा अर्थ नीट  समजावून सांगावा.)
‘मनोगत’ हा
शब्द वाचल्यावर आपणा सर्वाना वाटले असेल, की हा उपदेशाचा डोस असणार. खरं आहे; पण
हा ‘डोस’ नाही. तर सत्य परिस्थितीची जाणीव करून
देण्याचा एक प्रयत्न आहे.


निरनिराळ्या
वर्गातील मुलांना “ अभ्यास कशासाठी करता ? असं प्रश्न
विचारला; तर मुले अनेक उत्तरे देतात.” ‘स्वतःसाठी
अभ्यास करतो’ हे उत्तर बरोबर आहे. पण त्याचा खुलासा मात्र
मुलांना देता येत नाही. आणि त्यात अनपेक्षित काही नाही. आणि तो खुलासा मी देणार
आहे.


अभ्यास करायचा –
जास्तीत जास्त गुण मिळवायचे. “गुण” – म्हणजे
‘ज्ञान.’ सद्य परिस्थितीत “ ज्ञान
” मिळवून मोठे होण्याचा तो एक प्रचलित मार्ग आहे. पण अभ्यास
करताना फक्त “पास” होणे; असा विचार
घातक आहे. लौकिक अर्थाने ९०-९५ % गुण मिळविणारा विद्यार्थी हुशार समजला जातो. आणि
ते खरे आहे. पण याचाच अर्थ तो १०-५ % अज्ञान घेऊन उत्तीर्ण झाला आहे.- तर त्यात
काय चूक आहे ? १०० % गुण मिळविणे जवळजवळ अशक्य आहे. मान्य. पण जास्तीत जास्त गुण
मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करता का ? स्वतःच्या मनालाच विचारा.


तो प्रयत्न सर्वसाधारणपणे कमी पडतो, हे नक्की. दरवर्षी
वार्षिक परीक्षेतील टक्केवारी; अपवाद सोडता कमी होत असते. पुस्तकातील ज्ञान
समजावून घेण्याचा प्रयत्न कितीजण करतात ? पुस्तकात काही ठिकाणी “ हे
आपण मागे पाहिलेच आहे ” असे लिहिलेले असते. म्हणजेच आधीचे सर्व
समजले आहे असे समजून पुढील वर्षीचे पुस्तक तयार करतात. म्हणजे १०० % गुण जरी नाही
मिळाले तरी सर्व ज्ञान समजावून घेणे आवश्यक आहे. न समजलेला भाग समजावून घेण्यासाठी
कितीजण शिक्षकाना शंका/प्रश्न विचारतात ? कारण “लाज” वाटते.
का ? बरे, तो भाग खाजगी


क्लासमध्ये जाणारे तरी पूर्णपणे समजावून घेण्याचा प्रयत्न
करतात का ? अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घेणे आवश्यक


आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. ५ वी पासूनच
ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी. तसे न करणे आणि फक्त पास होणे म्हणजे ज्ञानाचा पाया
कच्चा ठेवणे. आणि आपल्या ज्ञानाची इमारत कच्च्या पायावर उभी करणे. कच्च्या
पायावरची इमारत धोकादायक असते. लहान आहोत, नंतर करू ही वृत्ती अतिशय धोकादायक आहे.
स्वतःला तहान लागली तर स्वतः पाणी पिण्यानंतर तहान भागते. तसेच स्वतः अभ्यास केला
तरच तुम्हाला ज्ञान मिळेल.


हा अभ्यास करून
काय होणार ? त्यातून तुमचे भविष्य घडणार आहे. मोठे झाल्यावर नोकरी, व्यवसाय काहीही
करा. तुम्ही भविष्यात रस्त्यावर पायी चालणार, सायकलवर हिंडणार, दुचाकी/चारचाकी
वाहनातून हिंडणार, की विमानाने हिंडणार हे ठरणार आहे. आज पालक तुमच्यासाठी कष्ट
करतात, पैसे खर्च करीत असतात – तुम्ही चांगला अभ्यास करावा म्हणून.
त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना काय देणार ? तुमच्या यशाचा आनंद द्या. हे सर्व
करणे त्यांचे कर्तव्य आहे, असेही म्हणणारे आहेत. मग तुमचे काय कर्तव्य आहे; ह्याचा
पण विचार करा. घरी १० पिढ्या पुरेल एवढा पैसा आहे, पण तो राखला नाही तर ४ त्या
पिढीला पण पुरात नाही असे इतिहासात दिसते. घरचा व्यवसाय आहे तो सांभाळण्यासाठी पण
ज्ञानाची आवश्यकता आहे. एकाच व्यवसाय १० पास होऊन चालविणे, बी. कॉम. होऊन चालविणे,
बी.कॉम.,एल.एल. बी. होऊन चालविणे, बी.कॉम.,एल.एल.बी.,एम.बी.ए. होऊन चालविणे ह्यात
खूप फरक आहे. स्पर्धा युगात काहीही घडू शकेल. नंतर पश्चाताप होऊन उपयोग
नाही.तुमच्या आई-वडिलांचे वैभव हे त्यांचे आहे. ते तुमच्यावर करीत असलेला खर्च हे
जरी त्यांचे कर्तव्य असले तरी तुमचेही काहीतरी कर्तव्य आहे हे विसरू नका.


५ वी पासूनच्या
सर्व विद्यार्थ्यांनी आजपासूनच हा विचार करावा. “
विस्तवास हात लावला की तो भाजतो
”हे निसर्ग
सत्य आहे. अभ्यास करणे
– न करणे याचे असेच आहे.


बघा,
माझे म्हणणे पटत असेल तर जोरात अभ्यासास सुरुवात करा. यशस्वी व्हा.


शुभेच्छा.

Monday, 1 July 2013

शिक्षणव्यवस्थेची मूल्याधारित पुनर्रचना आवश्यक !

शिक्षणव्यवस्थेची मूल्याधारित पुनर्रचना आवश्यक !


आपल्या गुणाधारित शिक्षणव्यवस्थेमुळे प्रत्येक विषयात उत्तीर्ण होणे अनिवार्य ठरते हे आपण पाहिले. या व्यवस्थेचा सर्वात मोठा दोष म्हणजे विद्यार्थी हा घोकंपट्टी करणारा भारवाही हमाल बनुन जातो व त्याची नैसर्गिक कौशल्ये/कल दुर्लक्षित राहतात. यातुनच नवनिर्मितीची क्षमता क्रमश: घटवली जाते. भारतियांत नवनिर्मितीची क्षमता नव्हती म्हणुन आपण ज्ञानविज्ञानात मागे पडलो ते पडलोच याबाबत आपण मागील लेखात चर्चा केली. भारतीय एकुणातीलच व्यवस्थेने नवनिर्माण क्षमतेचे मानसिक अपहरण केले होते हेही आपल्या सहज लक्षात येईल. दैववाद हे त्याचे कारण नसून प्रत्येक समाजघटकातील मुलांना आधी पोटार्थीच कसे बनवता येईल अशी शिक्षणपद्धती व मूल्यपद्धती जोपासली गेली असल्याचे आपल्या लक्षात येईल.

आपला पुरोहितवर्गही "भिक्षुक" म्हणुन अभिमानाने मिरवत असे तर इतरजण बालवयापासुनच परंपरागत धंद्यांत आंधळेपणे ढकलले जात असत. यात प्रत्येकात कोणत्या ना कोणत्या नवनिर्मितीची क्षमता असली तरी तशी संधी मिळणे अशक्यप्रायच होते! स्वतंत्र विचार करण्यासाठी अर्थव्यवस्था अनुकूल अथवा प्रतिकूल ठरू शकतात हे आपण जागतिक इतिहासात डोकावून पाहिले तरी लक्षात येईल. दहाव्या शतकानंतरची भारतीय अर्थव्यवस्था आणि तत्पुर्वीची अर्थव्यवस्था व नवनिर्मिती यात आपण तुलना केली तर हा मुद्दा सहज लक्षात येइल.

वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने खरे तर इतिहासापासून धडा घेत स्वतंत्र विचार करु शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत ज्ञानाधारित शिक्षणव्यवस्था अंगिकारणे आवश्यक होते. दुर्दैवाने तसे झाले नाही. उलट आपली शिक्षणव्यवस्था ही बेरोजगार निर्मितीचे मोठे कारखाने बनले. बेरोजगार शिक्षितांकडे दुसरे जगण्याचे कौशल्यच शिक्षणपद्धतीने दिले नसल्याने सुशिक्षितापेक्षा अशिक्षितांतच जगण्याची कौशल्ये अधिक आढळतात असे शिक्षणतज्ञच म्हणत असतील तर यावर गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे गुणाधारित शिक्षणपद्धती निर्मितीक्षमतेला मारक आहे हे उघड आहे. उदा. माझा कल वा आवड इतिहासाकडे आहे व मला गणितात अथवा विज्ञानात गती नाही. अशा परिस्थितीत मी गणित अथवा विज्ञान शिकणे व त्यात पास होणे अनिवार्य असावे काय? समजा मारुन मुटकून घोकंपट्टी करत मी त्यात पास जरी झालो तरी त्याचा, मला कसलेही आकलनच झाले नसल्याने, भावी जीवनात काही उपयोग आहे काय? मला सोडा त्या आकलनरहित अवस्थेत जेही विषय पास झालो त्यांत मी त्यात अधिकची भर घालत समाजाला उपयोगी बनू शकतो काय? यात माझे जी आवड, इतिहास, त्याचे काय होईल? इतर विषयांत पास होण्याच्या दडपणाखाली मला नाईलाजाने इतिहासाकडे दुर्लक्ष करावे लागणार नाही काय? म्हणजे ज्यात मला आवड आहे त्यात मला अधिकाधिक प्राविण्य (अगदी शिक्षणपद्धतीत दिलेल्या पाठ्यक्रमाबाहेर जात) मिळविण्याची संधी मिळणार आहे काय? त्या आवडीच्या विषयावर अधिक चिंतन मनन आणि नवा दृष्टीकोन स्वतंत्रपणे जोपासण्याची मला या पद्धतीत संधी आहे काय? या पद्धतीत माझा आणि शिक्षकांचा वेळ/परिश्रम व शासन (आणि माझे पालक) खर्च करत असल्याने तो खर्च ज्यात मला रस नाही त्यावर वाया घालविण्यासारखे नाही काय?

हे इतिहासाचे उदाहरण सर्वच विषयांबद्दल लागू आहे. पाठ्यक्रमाबाहेर असलेल्या पण जगण्याची साधने असलेल्या विषयांत...म्हणजे चित्रकला, लोहारकाम, कृषिशास्त्र, सुतारकाम इ. मद्धे एखाद्याला रुची असेल वा अंगभूत कौशल्य असेल तर ते कौशल्य प्राविण्यात बदलवत विद्यार्थ्याला त्यात तज्ञ बनवण्यासाठी अनुकूल अशी आपली शिक्षणव्यवस्था आहे काय?

एक अथवा दोन आवड असलेल्या विषयांतच संधी देत, पास होण्याची त्या विषयांची मर्यादा वाढवत अन्य विषयांतील गुण कितीही कमी अथवा जास्त असले तरी विद्यार्थ्याला पुढील वर्गात पाठवले तर काय अनर्थ होणार आहे काय?

हे प्रश्न अशासाठी विचारले कि यावर गंभीरपणे चिंतन करण्याची गरज आहे. यात असा प्रतिप्रश्न उपस्थित होवू शकतो तो हा कि विद्यार्थ्याचा नेमका कल कसा ठरवायचा? आज ज्या विषयाची आवड वाटते त्याची आवड पुढेही राहिलच हे कशावरुन?

तसेही आता सातवीपर्यंत विद्यार्थी पास होण्याचा तणाव नसल्याने निर्धास्त असतात. या सात वर्षांच्या कालावधीत विद्यार्थ्याचा कल, आवड, जिज्ञासा नेमकी कोणत्या विषयात आहे हे शिक्षकांना (व पालकांनाही) समजणे अशक्य नाही. त्याला मानसशास्त्रीय चाचण्यांचीही जोड देता येवू शकते. याच काळात ज्यात कल वाटतो त्या विषयांत अधिकचे (अभ्यासक्रमाबाहेर जात) स्वातंत्र्यही देता येवू शकते. शेवटच्या परिक्षेत कल असलेल्या विषयांतील मार्कच गृहित धरुन त्याला त्याच विषयात (अथवा एकापेक्षा अधिक विषय असतील तर निवदसंधी देत) माध्यमिक, उच्चमाध्यमिक व पदवी शिक्षण दिले तर काय होइल?

याचा सर्वात मोठा फायदा हा होईल कि विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्रात पदवी वयातच एरवी आपल्या शिक्षणव्यवस्थेत अशक्य आहे असे अधिकचे प्राविण्य मिळवू शकेल. तज्ञ बनू शकेल. त्यातुनच नवनिर्मितीला वाव मिळु शकतो आणि देशात विविध विषयांतील व त्यांच्या शाखा-उपशाखांतील पारंगत अशा तज्ञांच्या फौजा उभ्या राहू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

या पद्धतीचा होणारा संभाव्य पण सर्वात महत्वाचा फायदा असा कि विद्यार्थ्याला एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन आपली बांधणी करता येणे सहज शक्य आहे. प्रचलित शिक्षणपद्धतीत प्रत्येक विद्यार्थी हा मानसिक कुंठेतून अपरिहार्यपणे जात असतो. केवळ गरजेपोटी जेंव्हा नको ते विषयही अभ्यासावेच लागतात, अधिकाधिक गुण मिळवत इतरांशीच्या स्पर्धेत अविरत संघर्षायमान रहावे लागते तेंव्हा मानवी व्यक्तिमत्वाचे आकुंचन होत विकासशील नव्हे तर स्पर्धाधारित नागरिक निर्माण होणे अपरिहार्य आहे. यातुन जी समाजव्यवस्था (राजकीय/आर्थिक/बौद्धिक) आकाराला येते ती तशीच संकुचित व परस्परांकडे स्पर्धेच्या भावनेने पिडीत झाल्याने नकारात्मक असते. आणि नकारात्मक मनोवृत्तीच्या समाजात नवनिर्मिती कशी होणार? विद्यार्थीदशेतच काय शिकायचे आहे याचे विद्यार्थ्याचे स्वातंत्र्य नाकारले जात असेल तर कोणत्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे नागरिक आम्ही घडवणार आहोत?

आज शिक्षण पुर्ण होऊनही विद्यार्थ्यांना नोक-यांसाठी स्पर्धा परिक्षा का द्याव्या लागतात? याचाच अर्थ आधी जे काही शिकले, मेरिटचे गुण मिळवले ते निरर्थक होते असे आम्हीच मान्य करतो असे नव्हे काय? दोनशे जागांसाठी दोन लाख अर्ज हा सध्याचा सरासरी नोकरी मागणारे आणि उपलब्ध नोक-या यांतील अवाढव्य तफावत दर्शवत नाही काय? या परिक्षा, त्यांतील नेहमीचे गोंधळ व जीवघेणी स्पर्धा यातून आपण निकोप समाज घडवत नसून हिंस्त्र आणि स्वार्थप्रणित नागरिक घडवत असतो असे नव्हे काय? जीवनाची श्रेष्ठ मुल्ये या निरर्थक स्पर्धात्मकतेमुळे हरपतात व आज आपली जी भ्रष्ट व्यवस्था उभी राहिलेली आहे तिला आपली शिक्षणव्यवस्थाच कारणीभूत नव्हे काय?

या जगात स्कोप नाही असा विषय नाही. एखाद्या क्षेत्रात संध्यांची निर्माण होणारी लाट ही चिरकालिक नसून तात्पुरती असते. त्यामुळे जे अशा लाटांवर स्वार आधी होतात ते फायद्यात जात असले तरी नंतरच्या झुंडी मात्र क्रमश: कशा तोट्यात जावू लागतात हे आपण आय.टी. क्षेत्राबाबतही पाहू शकतो. बरे या झुंडी स्वत:चे असे काही नवयोगदान देण्याच्या स्थितीत असतात काय? याचे उत्तर जवळपास नाही असेच असते...कारण तसे प्राविण्य त्याच्याकडे नसतेच.अशा शिक्षनपद्धतीत फक्त नोक-या मागणारे अधिक असतात तर नोक-या निर्माण करु शकणारे अत्यल्प. या परिस्थितीत राष्ट्राचा अर्थविकास होणे कसे शक्य आहे? ज्ञानविकासाची मग बातच नको!

त्यामुळे आपल्याला आपल्या शिक्षणपद्धतीचा फेरविचार करणे अनिवार्य असे बनले आहे. प्रत्येक मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे व त्याचे स्वत:चे असे विकसित होवू शकणारे स्वतंत्र ज्ञानविषय आहेत हे मानसशास्त्रीय भान आपल्याला येणे अत्यावश्यक आहे. त्याचे भान ठेवतच तशी शिक्षणपद्धती बनवली गेली पाहिजे. राबवली गेली पाहिजे!

अन्यथा भारत ज्ञानकारणापासून ते अर्थकारणापर्यंत आजवर ज्या भिक्षुकी अवस्थेत आहे त्यात पुढेही विषेष फरक पडणार नाही. जाग येईल तोवर आपली साधनसंपत्ती जवळपास नष्ट झाली असेल व आर्थिक दृष्ट्या आपण पुन्हा अराजकाने हिंस्त्र बनलेल्या मध्ययुगात फेकले गेलेलो असू याचे भान आपल्याला वेळीच आले पाहिजे.

Thursday, 21 February 2013

विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची जबाबदारी

 विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची जबाबदारी..

शाळा, कॉलेज आणि क्लासच्या अभ्यासाचा बोजा, पालकांच्या न पेलवणार्‍या अपेक्षांचे ओझे, स्पर्धात्मक परीक्षा त्यासाठी करावी लागणारी सततची धावपळ, वाढते ताणतणाव, त्यातून येणारे वैफल्य, आजार, कौटुंबिक तंटेबखेड..

              अशा अनेक समस्यांमुळे १४ ते १९ या वयोगटातील तरुण/तरुणींचे अभ्यासातील लक्ष कमी होणे, बेछुट वागणे, मित्र/मैत्रिणींच्या आग्रहाला आणि भरकटलेल्या विचारांना बळी पडून व्यसनाधीनतेकडे वळण्याची वृत्ती, आत्मसंय्यम आणि आत्मविश्वास ढासळणे असे काहीसे सध्या बघण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रांतून नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या माहितीच्या आधारे आपल्या देशात गेल्यावर्षी ३०३५ मुलांनी आत्महत्या केली. त्यातील परीक्षेत नापास झालेली मुलं २८३, फॅमेली प्रोब्लेमने आत्महत्या केलेली मुलं ३४४, गंभीर आजार बरा न झाल्याने आत्महत्या केलेली मुलं २६२ आणि प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केलेली मुलं २१५. असो.

आठवडयापूर्वी पुण्यामधील दहावी/अकरावीतील ७०० मुला/मुलींनी दारू पिऊन धिंगाणा घातला ही सर्व पालक आणि पाल्यांना काळीमा फासणारी घटना घडाण्यामागे काही अंशी वरील कारणे असू शकतील पण भविष्यात अशा घटना घडूच नयेत म्हणून आता काय खबरदारी घेणे आवश्यक आहे? त्यासाठी काय करायला पाहिजे? ह्या गोष्टींकडे सर्व पालक आणि पाल्यांनी अंतर्मुख होऊन लौकरात लौकर निर्णय घेणे उचीत ठरेल.


मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या वयात अशा पार्ट्या कारणे कितपत योग्य? तसेच पालकांनी मुलांना पार्टीला परवांगी देतांना पुढील गोष्टी विचारात घेणे आवश्यक होते की मुलगा/मुलगी ज्या पार्टी जात आहेत ती कोणी अॅरेंज केली आहे, त्यांचा पूर्व इतिहास काय आहे? त्याचे ठिकाण कोठे आहे? किती फी आहे? कुठल्या वेळी आहे? त्यात कुठले मित्र/मैत्रिणी सहभागी होणार आहेत? याची अगोदरच काळजी घेतली असती तर अशी पालकांची आणि विद्यार्थ्यांची नाचक्की झाली नसती. पण घडायचे ते घडून गेल्यावर उगाच सर्व गोष्टींचा काथ्याकुट करण्यात काही उपयोग नाही. त्या पेक्षा भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी पालक आणि पाल्यांनी काय उपाय योजना आखणे महत्वाचे आहे यावर गांभीर्याने चर्चा करून ते अमलात आणणे खूप गरजेचे आहे.


मुला/मुलींना ओरडण्यापेक्षा किंवा घालूनपाडून बोलण्यापेक्षा सद्य स्थितीत धीर देणे, त्यांनां विश्वासात घेणे आणि त्यांना आत्मनिर्भय करणे गरजेचे आहे. त्यांच्या चुकीच्या कल्पना आणि वास्तव यात काय फरक आहे हे नीट समजून सांगणे जरुरीचे आहे. आनंद कशात असतो तो कसा साजरा करावा आणि दुःख पदरी आले किंवा पराभव झाला तर तो कसा पचवायचा त्यातून धीर न सोडता, निराश न होता मार्ग कसा काढायचा त्यावर पुन्हा विजय कसा मिळाववा हे समजून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी पालकांनीही पाल्यांसमोर स्वत:च्या आचरणाने आणि वर्तनाने चांगला आदर्श ठेवणे गरजेचे आहे.


पालकच जर आनंद साजरा करण्यासाठी दारूच्या पार्ट्या झोडत असतील आणि दु:ख विसरण्यासाठी वाईट व्यसनांचा मार्ग अवलंबित असतील किंवा पाल्यांपुढे व्यक्त करीत असतील तर या सारखे दुर्दैव ते कुठले? आणि यातच पालकांना धन्यता वाटत असेल तर पाल्यांना एक प्रकारचे चुकीचे प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे. मग तरुण/तरुणींची डोकी भडकली तर त्याचा दोष कोणाला द्यायचा? याचा अर्थ असा नाही की त्यांनी असे गैरवर्तन करावे. प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे पण त्याचा त्यांनी कसा चांगला उपयोग करायचा हे समजावून सांगणे महत्वाचे आहे आणि त्याची जबाबदारी पालक आणि समाजावर आहे.


प्रथम पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आई/वडिलांनी मुलांच्या समोर न भांडता एकमेकांचा सम्मान करणे, आब राखणे, मुलांच्या समोर एकमेकांची उणीदुणी न काढणे फार महत्वाचे आहे. कारण याच वयात मुले/मुली पालकांचे आचरण आपल्या दैनदिन जीवनात राबवत असतात. खरे काय, खोटे आणि नकली काय याची वेळीच जाणीव करून देणे नितांत गरजेचे आहे.


वरील घटनेला बहुतांशी पालकांचा पाल्यांशी असलेल्या संवादाचा अभाव, पालकांचे पाल्यांवर बारकाईने लक्ष नसणे, आपल्या करियरच्या विचाराने मुलं/मुलीकडे पालकांचा लक्ष द्यायला वेळ नसणे तसेच घरात काय करतात? मित्र कोण येतात? कॉम्पुटरवर कुठल्या साईट मध्ये रुची आहे? कुठले गेम आवडतात? पॉकीटमनी कसा आणि कशावर खर्च करतात याचे त्यांच्याबाबातीतील विचार पडताळून पाहणे आणि अचानक हिशोब मागणे आवश्यक आहे.


मुख्य म्हणजे पालकांनी लहान व कोवळ्या वयात पाल्यांवर चांगले संस्कार घडवले पाहिजेत. विविध भाषांतील चांगल्या लेखकांची पुस्तके, संतांची चरित्रे, मार्गदर्शनपर ग्रंथ, कथा, कादंबर्‍या, कविता वाचण्याची रुची निमार्ण कारणे गरजेचे आहे. सद्य स्थितीत देश भक्ती आणि प्रेम जागरूक करणे फार महत्वाचे आहे. थोरामोठ्यांचा आणि गुरुजनांचा आदर राखण्याचे धडे आपल्या कृतीतून पाल्यांनी आचरणात आणले पाहिजेत. हे संस्कार त्यांना त्यांच्या आयुष्यभर पुरतील आणि ते पुढच्या पिढीत झिरपले तरच अशा घटनांना भविष्यात ब्रेक लागेल. माणसांच्या मानसिकतेचा विचार करता कुठलीही वाईट गोष्ट, व्यसन किंवा दुर्गुण लौकर अंगिकारले जातात कारण त्यांना कष्ट पडत नाहीत पण चांगले गुण, संस्कार रक्तात भिनायला किंवा मन व बुद्धीला पटण्यासाठी वेळ लागतो. ते सहजासहजी पटत नाहीत.


शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

शिक्षण क्षेत्राचा सांगाडा !

आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे.

शिक्षण घेण्याच्या अधिकाराला आपल्या घटनेने मूलभूत हक्कात समाविष्ट केले आहे. देशातील कोणत्याही वयोगटाच्या नागरिकाला शिकण्याचा म्हणजे सुशिक्षित होण्याचा अधिकार आहे. या अधिकारापासून कोणी वंचित राहू नये म्हणून सरकार बराच खर्च करीत असते. अलीकडील काळात तर केंद्र सरकारने “सर्व शिक्षा मोहीम” हा प्रचंड महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे. २००८ पर्यंत देशातील एकही बालक प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहू नये, हे या योजनेचे प्रमुख लक्ष्य आहे. त्यासाठी प्रचंड प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. २०२० पर्यंत भारताला जागतिक महासत्ता बनविण्याचे स्वप्न पाहिले जात आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात येण्यासाठी शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होणे महत्त्वाचे आहे; परंतु त्यासोबतच शिक्षणाचा दर्जा हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचा प्रयत्न सरकारतर्फे होत असला तरी या शिक्षणाच्या दर्जाविषयी सरकार मुळीच गंभीर नाही. लिहिता-वाचता येणे हीच सरकारची शिक्षणविषयक व्याख्या असेल तर शिक्षित बेरोजगारांच्या संख्येत वाढ होण्यापलिकडे त्यातून फारसे काही साध्य होईल असे वाटत नाही.

सरकारी योजना म्हटली, की मूळ उद्देश बाजूला सारून बाकीच्या फाफटपसार्‍यावर अतोनात खर्च, हा जणू शिरस्ताच बनला आहे. सरकारची कोणतीही योजना, कोणतेही धोरण निर्धारित कालावधीत अपेक्षित लक्ष्य गाठू शकत नाही. यासाठी नियोजनाचा अभाव, लक्ष्यपुर्तीचे साधन असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेत वाढत चाललेला बेजबाबदारपणा, भ्रष्टाचार आणि दूरदृष्टीचा अभाव या गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत असतात. संपूर्ण भारताला सुशिक्षित करण्याचे लक्ष्य आम्ही निर्धारित तर केले; परंतु त्यासाठी आवश्यक व्यवस्था उभी करताना आम्ही कोणतीही दूरदृष्टी दाखविली नाही. परिणामस्वरुप शिक्षितांचे (त्यातले फारच थोडे सुशिक्षित असतात.) बेरोजगार तांडे उभे राहिले. सरकारी नोकरी करण्यापेक्षा अधिक पात्रता या शिक्षितांमध्ये निर्माण होऊ शकली नाही. केवळ बाबू तयार करण्यासाठी या देशात रुजविण्यात आलेल्या मेकॉलेप्रणीत ब्रिटीशकालीन शिक्षण व्यवस्थेला झुगारून देणे आम्हाला शक्य न झाल्याने देशाच्या विकासात शिक्षितांचा हातभार लागण्याची अपेक्षा फोल ठरली. प्रचलित शिक्षण व्यवस्था विकासाच्या दृष्टीने कुचकामी ठरल्याचे सिद्ध झाल्यानंतरदेखील सरकार त्यावर गंभीरतेने विचार करताना दिसत नाही. केवळ लिहिता-वाचता येणारी पिढी देशाचे भवितव्य घडवू शकत नाही.

देशाला खर्‍या अर्थाने महासत्ता बनवायचे असेल, तर शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन, सुधारणा कराव्या लागतील. सध्या दिले जाणारे शिक्षण कालबाह्य ठरले आहे. या मरू घातलेल्या व्यवस्थेला खतपाणी घालून जगविण्याचा अट्टहास करण्यापेक्षा लवकरच नवा पर्याय उभा करणे अधिक श्रेयस्कर ठरेल. सरकारला ते शक्य नसेल, तर सरकारने खासगी क्षेत्राकडे ती जबाबदारी सोपवावी. ज्या ज्या गोष्टीचे सरकारीकरण झाले त्या त्या गोष्टीची केवळ वाटच लागली आहे. व्यवस्थित चाललेल्या कापसाच्या व्यापारात एकाधिकाराच्या माध्यमातून सरकारने शिरकाव केला आणि संपूर्ण व्यापाराची वाट लागली. व्यापारीही संपले आणि शेतकरीसुद्धा नागविला गेला. पणन महासंघसुद्धा घाट्यात गेला. व्यापाराच्या साध्या नियमानुसार कोणालातरी फायदा व्हायला हवा होता, परंतु तसे झाले नाही. सरकारच्या परिसस्पर्शाने सोन्याची माती होण्याचे, हे एकमेव उदाहरण नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे शिक्षण क्षेत्राची देशाच्या विकासासोबत सांगड घालायची असेल, तर या क्षेत्रावरील सरकारी नियंत्रण दूर झाले पाहिजे. अनेक सरकारी, विशेषत: जिल्हा परिषद, नगरपालिकांच्या शाळांची अवस्था पाहिल्यावर तर शिक्षण सरकारी नियंत्रणातून तातडीने मुक्त होणे किती गरजेचे आहे, हे लक्षात येते. त्यामुळे सरकारने या क्षेत्रातून आता बाजूला व्हावे. मुलांना खिचडी खायला देणे, मोफत पाठ्यपुस्तके वाटणे यासारख्या उपक्रमातून शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याचा प्रयत्न अगदीच हास्यास्पद ठरला आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्यांना खरोखरच शिकवायचे आहे त्यांच्या लेखी खिचडी किंवा मोफत पुस्तके सारख्या उपक्रमांना फारशी किंमत नाही आणि जी मुलं केवळ खिचडीच्या प्रलोभनाने शाळेत येतात त्यांना शिक्षणाचे काय महत्त्व वाटणार? खरे तर मुलांनी शाळेत यावे यासाठी सरकारला खिचडीचे प्रलोभन दाखवावेसे वाटते, हीच मुळी अतिशय लज्जास्पद बाब आहे. भुकेसारखी अगदीच प्राथमिक गरज ज्या देशात एक समस्या आहे, त्या देशाने आपल्या संपूर्ण धोरणाचाच पुनर्विचार केलेला बरा. शिकायचे कशासाठी तर कुठेतरी नोकरी मिळेल, चार पैसे हातात येतील, आपली आणि कुटुंबाची दोन वेळच्या जेवणाची सोय होईल. शिक्षणाचा सरळ संबंध पोट भरण्यासाठी लागणारी पात्रता मिळविण्याशी आहे. अशा परिस्थितीत देशाच्या विकासाला शिक्षितांचा हातभार लागण्याचा प्रश्न येतोच कुठे? आमच्या पदवीधारकांकडून देशाने केवळ खर्डेघाशी करण्याची अपेक्षा बाळगावी काय? जोपर्यंत अगदी प्राथमिक स्तरापासूनचे शिक्षण व्यवसायाभिमुख आणि सरकारी नियंत्रणातून स्वतंत्र होत नाही तोपर्यंत तरी परिस्थितीत फारसा बदल होण्याची शक्यता नाही. सरकारी नियंत्रणामुळे शिक्षणाला एक साचेबद्धपणा आला आहे.

एका आखून दिलेल्या चाकोरीतून विद्यार्थी आणि शिक्षकाला इच्छा असो वा नसो, मार्गक्रमण करावे लागत आहे. प्रत्यक्ष व्यवहारात ज्यांचा काडीचाही उपयोग नाही, असे अनेक विषय विद्यार्थ्यांवर बळजबरीने लादले जातात. खरेतर शिक्षण म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित करण्याचे माध्यम ठरायला हवे, परंतु आपल्याकडील शिक्षण पद्धतीने विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना विकसित होण्याचा वावच ठेवलेला नाही. बाबू तयार करण्याच्या या कारखान्यातून कृषीतज्ज्ञ, वैद्यकीय तज्ज्ञ, यांत्रिकी तज्ज्ञ, विविध विषयांतील संशोधक बाहेर पडण्याची शक्यता अतिशय विरळ आहे. जे कोणी या विषयामध्ये तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात त्यापैकी बहुतेकांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर हे लक्ष्य साध्य केले आहे. आपल्या शिक्षण पद्धतीने त्यांना घडविले असे म्हणण्याची हिंमत कोणी करू शकत नाही. आपली शिक्षण पद्धत घडविण्यापेक्षा बिघडविण्याचेच काम अधिक करते. हे बिघडविणे असेच सुरू राहिले, तर भविष्यात इतर अनेक वस्तूंप्रमाणे विविध क्षेत्रांतील तज्ज्ञदेखील आपल्याला आयात करावे लागतील. आजही उच्च शिक्षणासाठी विदेशात जाणार्‍यांचे प्रमाण कमी नाही. वास्तविक एकेकाळी आपला देश शिक्षण क्षेत्रात संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक म्हणून ओळखला जात होता. तक्षशीला, नालंदासारख्या विद्यापीठांना तीर्थस्थानाचा दर्जा होता. अनेक विदेशी अभ्यासक आपल्या देशातील उच्च शिक्षण प्राप्त करीत असत. आज गंगा उलटी वाहू लागली आहे. आमची शिक्षण व्यवस्था सरकारी हस्तक्षेपामुळे इतकी पंगु बनली आहे, की आमच्या पदवीधरांना विदेशात काडीचीही किंमत नाही. शिक्षणामुळे व्यक्तीमत्वाचा, बुद्धीचा विकास होणे अपेक्षित असते; परंतु आमच्या शिक्षण व्यवस्थेने या विकासापेक्षा संकोचावरच अधिक भर दिल्याचे दिसून येत आहे. अंगभूत बुद्धीमत्ता, क्षमता असूनही आमच्या विद्यार्थ्यांना विकासाची पुरेशी संधी आणि वाव प्रचलित व्यवस्थेने मिळू दिला नाही. भारताकडे नेहमीच एका मोठ्या गिर्‍हाईकाच्या दृष्टीने पाहणार्‍या पाश्चात्य जगाने ही बाबदेखील अचूक हेरली आहे. आता भारतात विदेशी विद्यापीठांचे आगमन होत आहे. अगदी पुढील वर्षापासूनच ही विदेशी विद्यापीठे भारतात दाखल होत आहेत. ज्या भारताने संपूर्ण जगाला ज्ञान दिले त्याच भारताला आता शिक्षणासाठी विदेशी विद्यापीठांचा आधार घ्यावा लागण्याची नामुष्की पत्करावी लागत आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणासाठी अक्षरश: कोट्यवधी रुपयांची उधळण करणार्‍या सरकारने शिक्षणाच्या मूलभूत कल्पना आणि त्या अनुषंगाने शिक्षणाचा दर्जा या गोष्टींकडे लक्ष दिले नाही, तर हा खर्च निव्वळ अनाठायी ठरेल; परंतु आपले सरकार इतिहासाच्या पुस्तकात कोणाचे धडे असावेत किंवा नसावेत या बाबतीतच अधिक दक्ष असते. सरकारने आपल्या क्षुद्र राजकारणासाठी शिक्षण क्षेत्रालाही वेठीस धरावयास कमी केले नाही. सरकारच्या या अतिरेकी हस्तक्षेपामुळेच शिक्षण क्षेत्र पूर्णत: नासले आहे. मागेल त्याला शाळा देऊन, ठिकठिकाणी शाळा उघडून देशात शैक्षणिक क्रांती होईल अशी अपेक्षा सरकार बाळगत असेल, तर ते निश्चितच मुर्खाच्या नंदनवनात वावरत आहे, असेच म्हणावे लागेल. सरकारला अपेक्षित ही क्रांतीदेखील हरितक्रांतीच्या वाटेने जाऊन निष्फळ ठरणार आहे. आज खरी गरज आहे ती शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या विकासाला हातभार लावणारी पिढी निर्माण करण्याची. जोपर्यंत शिक्षणाचे सरकारीकरण कायम आहे तोपर्यंत तरी ते शक्य नाही. त्यासाठी सरकारने आधी या क्षेत्रातून बाजूला व्हावे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी केवळ अनुदानापुरता सरकारने शिक्षण क्षेत्राशी आपला संबंध कायम ठेवावा आणि संपूर्ण क्षेत्र मुक्त करावे.

आपली संपूर्ण शिक्षणप्रणाली विदेशी विद्यापीठांच्या जाळ्यात अडकण्यापूर्वीच सरकारने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे. शिक्षण क्षेत्राच्या मरू घातलेल्या सांगाड्यात जीव ओतण्याचा प्रयत्न करण्याऐवजी नव्या रसरशीत, चैतन्याने भरलेल्या, इथल्या संस्कृतीशी, प्राचीन ज्ञानाशी इमान राखणार्‍या शिक्षणपद्धतीला विकसित होऊ द्यावे. त्यासाठी खासगी क्षेत्राची सरकारने मदत घ्यावी. शिक्षणाचा अधिकार जसा मूलभूत अधिकार आहे तसाच काय शिकावे ही बाबसुद्धा मूलभूत अधिकारातच मोडते. आम्ही शिकवू तेच शिका, अशी जबरदस्ती करणारी प्रचलित पद्धत आता मोडलेलीच बरी.

Saturday, 9 February 2013

इंडिया, भारत आणि हिंदुस्थान !

इंडिया, भारत आणि हिंदुस्थान..

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोकं

'सर्वेक्षण' ही सध्याच्या युगातील अतिशय लोकप्रिय आणि अंत्यत आवश्यक अशी शास्त्रीय पध्दत आहे. कोणतीही योजना प्रकल्प उद्योग किंवा कारखाना सुरू करावयाचा असेल तर सर्व संबंधित बाबींचा सारासार विचार करण्यासाठी सर्वेक्षण केले जाते म्हणजे सर्व्हे घेतला जातो.

दुपारचे जेवण झाल्यावर थोडी वामकुक्षी घेत असतांना दारावरची बेल वाजल्यामुळे जाग येते. दार उघडून बघतो तर एक वीसबावीस वर्षाची तरूणी अदबीने विचारते की एक सर्व्हे घ्यायचा आहे पाच मिनिटांत होईल. तिला ह्या भागातील कुटुंबात कोणत्या ब्रँन्डचे साबण, कपडे धुण्याच्या पावडरी वगैरे वापरले जातात आणि घरात कोणते कपडे धुलाई मशीन्स आहेत ह्याची आकडेवारी जमा करावयाची होती. अशाप्रकारची सर्वेक्षणे करण्यासाठी कंपन्यात स्वतंत्र खाती असतात आणि खास प्रशिक्षण दिलेली माणसे त्यात काम करतात. इतकेच नव्हे तर विशिष्ट प्रकारची सर्वेक्षणे करण्याची सेवा देणार्‍या कंपन्याही आहेत.

आम्हीही एक सर्वेक्षण केले आणि भोवतालच्या नागरिकांना एक प्रश्न विचारला 'तुम्ही कोणत्या देशात राहता ?' नागरिकांनी दिलेली उत्तरे आम्ही लिहून ठेवली. नागरिकांची इतर माहिती म्हणजे शिक्षण आर्थिक परिस्थिती घरात असलेल्या सोयीसुविधा कुटुंबियांच्या सवयी छंद वगैरेही नीट लिहून त्या माहितीचे विश्लेषणही केले.

काही थोडया नागरिकांनी सांगितले आम्ही 'इंडिया' त राहतो त्यापेक्षा जास्त नागरिकांनी सांगितले आम्ही 'भारता' त राहतो आणि बहुसंख्य नागरिकांनी सांगितले आम्ही 'हिंदुस्थाना' त राहतो.


विश्लेषणानुसार असे आढळते की इंडियात राहणारे लोक उच्चविद्याविभूषित आणि आर्थिक दृष्टया सधन ह्या वर्गात सामावतात. या लोकांजवळ सगळी अत्याधुनिक उपकरणे असतात. फ्रीज, टीव्ही, टेलिफोन, मोटारी, संगणक वगैरे सगळया अत्याधुनिक सुखसोयी यांच्या सेवेत हजर असतात. यांची मुले खूप शिकलेली असतात त्यांना भरपूर पगाराच्या नोकर्‍या असतात. काहींची मुले आपल्या देशातील शिक्षण पूर्ण करून आणखी उच्चशिक्षणासाठी परदेशात विशेषत: पाश्चिमात्य देशात गेलेली असतात आणि हेही सतत परदेशच्या वार्‍या करीत असतात. पाश्चिमात्य देश आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत तेव्हा तिकडे ज्या काही नवीन सुखसोयी उपलब्ध होतात त्या हे लोक मायदेशी परत येतांना आपल्याबरोबर घेऊन येतात.

भारतात राहणारे लोक कृतीने 'आपण बरे की आपला व्यवसाय आणि संसार बरा' अशातर्‍हेने जगतात. लायब्ररीतून पुस्तके आणायची नाटके बघायची भाषणे ऐकायची वृत्तपत्रे वाचतंाना आपल्या पंतप्रधानांनी काश्मिरच्या बाबतीत काय करायला पाहिजे होते? त्यांचे कुठे चुकते आहे? अमेरिकेचे अध्यक्ष बुश यंानी नेमके कुठे बाँम्ब टाकायला पाहिजेत? ओसामा बीन लादेनला कसा पकडला पाहिजे? आपण क्रिकेटची मॅच का हरलो? टीममध्ये कोणकोणत्या खेळाडूंचा समावेश करावा आणि कुणाला डच्चू द्यावा वगैरे बाबतीत हे अगदी तज्ज्ञ असल्यासारखे आपले विचार मांडीत असतात आणि एकमेकांशी वादविवाद करीत असतात.

हिंदुस्थानात राहणार्‍या नागरिकांची संख्या खूपच जास्त आहे. ह्यांना भरपूर वेळ असतो आरामात झोपून उठाव आणि सावकाश काम करीत दिवस घालवावा असा यांचा आयुष्यक्रम असतो. हे लोक गणपती, शंकर, देवी, हनुमान यांच्या देवळांसमोर ठराविक दिवशी दर्शनासाठी रांगा लावतात. आज गणपती उद्या शंकर परवा हनुमान अशी यांची देवळे ठरलेली असतात. देवाला नवस बोलून आणि साकडे घालून आपल्या सर्व समस्या सुटतील अशी ह्यांची ठाम समजूत असते. रांगांच्या बाबतीत गणपती मंदीरे आघाडीवर आहेत.

अनेक ठिकाणच्या संतश्रेष्ठींच्या देवळांसमोर तर रोजच प्रचंड रांगा असतात. ह्या संतश्रेष्ठांचे तत्त्वज्ञान आणि शिकवण समजून घेण्यापेक्षा त्यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आलो हे सांगण्यातच हिंदुस्थानातले लोक धन्यता मानीत असावेत. इंडियात आणि भारतात राहणारेही बरेच वेळा हिंदुस्थानात येतात.

हिंदुस्थानातील बहुसंख्य जनता प्रत्येक ठिकाणच्या कुंभमेळ्यात लाखोंच्या संख्येने जाते आणि पवित्र कुंडात किंवा नदीसंगमावर पवित्र स्नान करून स्वच्छ होऊन घरी येते. चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, मकर संक्रांत काही विशिष्ट पौर्णिमा, अमावास्या वगैरे प्रसंगी हे लोक नदी, तलाव, समुद्र आणि काहीच नसले तर आपले न्हाणीघर ह्यात पवित्र स्नान करून स्वच्छ आणि शुध्द होतात. इंडियात न्हाणीघराला, बाथरूम म्हणतात.

हे सर्व सांगण्याचा उद्देश म्हणजे समाजात वैचारिक शैक्षणिक सांस्कृतिक आर्थिक वगैरे बाबतीत तफावत असलेले स्तर किंवा गट असतात हा आहे. म्हणून प्रश्न पडतो की प्रगत झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान किंवा वेळोवेळी राबवल्या जाणार्‍या सरकारी योजना समाजाच्या नेमक्या कोणत्या स्तरासाठी उपयोगी ठरणार आहेत ह्याचा कुणी विचार करतो का? २१ व्या शतकातील इंटरनेट वगैरे आधुनिक तंत्रज्ञान वापरायचे म्हणजे संगणक पाहिजेच. तो विकत घेण्याची आणि वापरण्याची ज्याची कुवत असेल तोच त्याचा फायदा घेऊ शकेल. सध्या आपण जगातली महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत आहोत ते कशाच्या भरवशावर?

आपल्या देशातील लोकसंख्येची स्थिती समुद्रातल्या हिमनगासारखी आहे. त्याचा एक दशांश भाग पाण्यावर असतो आणि नऊ दशांश भाग पाण्याखाली असतो. पाण्याबाहेरचा भाग म्हणजे इंडियात राहणारे लोक आणि पाण्याखालील नऊ दशांश भाग म्हणजे हिंदूस्थानात राहणारे लोक. आपण अत्याधुनिक प्रगती दर्शविणार्‍या सुखसोयी म्हणतो त्या बहुतेक ह्या एक दशांश भागाजवळ असतात. देशातील नऊ दशांश संपत्ती ह्या एक दशांश लोकांकडे असते. आपण आयात केलेले बहुतेक तंत्रज्ञान ह्या लोकांसाठी असते.

प्रगतीच्या नावाखाली अंमलात आणल्या जाणार्‍या योजना समाजाच्या कोणत्या गटासाठी असाव्यात ह्याचा विचार प्रथम केला पाहिजे. एखादे उत्त्पादन बाजारात आणायचे म्हणजे त्याला गिर्‍हाईक कुठे मिळेल? किती किंमतीला त्याला ते परवडेल? ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचविता येईल? वगैरे बाबींचा विचार त्या वस्तूचा उत्पादक प्रथम करतो आणि नंतरच उत्पादनाला सुरूवात करतो.

आपण औषधाच्या गोळया घेतो तेव्हा कुणीही कोणतीही गोळी घेत नाही जो रोग ज्याला झाला असेल तोच त्या रोगावर उपायकारक असलेल्या औषधाच्या गोळया घेतो. थोडक्यात म्हणजे गरजेला प्राधान्य आहे. एक दशांश भागासाठी कोणत्या योजना उपयोगी पडतील आणि नऊ दशांश भागासाठी कोणत्या? ह्याचा सारासार विचार करूनच कृती केली तर देशाची सर्वांगीण प्रगती होईल. सध्या श्रीमंत वर्ग अधिक श्रीमंत होतो आहे आणि गरीब वर्ग अधिक गरीब.

२९ डिसेंबर २००१ च्या वृत्तपत्रात 'स्मार्ट स्कूल' संबंधी आलेले वृत्त बोलके आहे. संगणक शिक्षणासाठी आपल्या देशभरात सुमारे १००० 'स्मार्ट स्कूल्स' म्हणजे 'हुशार शाळा' स्थापन करण्याची केंद्र सरकारची योजना असल्याचे मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. मुरलीमनोहर जोशी यांनी भोपाळ येथे सांगितले. या शाळांमधून स्पर्धात्मक कार्यक्षम आणि व्यावसायिक पध्दतीने शिक्षण देण्यात येणार आहे. या शाळा हळुहळू अन्य शाळांना जोडण्यात येणार असून त्या योगे देशभरात संगणकाचे शिक्षण देणार्‍या सुमारे एक लाख शाळा निर्माण करण्याची ही योजना असल्याचे डॉ जोशी ह्यांनी सांगितले. मध्य प्रदेशातील शाळांमध्ये संगणक शिक्षण देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या 'हेड स्टार्ट' या सॉफ्टवेअरचे प्रकाशन डॉ जोशी यांच्या हस्ते झाले त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.

इंडियात राहणार्‍या लोकांसाठी एक लाख संगणक शाळा काढण्याची योजना असेल तर हिंदुस्थानात राहणार्‍या लोकांसाठी निदान ५ लाख प्राथमिक शाळा काढून त्यासाठी प्रत्येकी निदान एक तरी प्राथमिक शिक्षक नेमण्याची योजना का असू नये?

भारताच्या स्वातंत्र्य लढयात देशभक्तीची जागृती तळागाळाच्या लोकांपर्यतही पोचली होती. म्हणूनच प्रचंड ताकद निर्माण झाली. जेव्हा समाजातील सर्व स्तरातील वैचारिक, शैक्षणिक आणि आर्थिक दरी म्हणजे तफावत कमी होईल तेव्हाच आपला देश ताकदवान होईल आणि जगातली महासत्ता होण्याचे स्वप्न साकार होऊ शकेल. भलेही तो इंडिया असो की भारत असो की हिंदुस्थान !!