शिक्षण,शिक्षक व विद्यार्थी: एक चिंतन
समाजाचे एकक आहे व्यक्ती, मानवप्राणी. या मानवप्राण्याचा बाल्यावस्थेतून प्रौढावस्था व नंतर वृद्धावस्था असा प्रवास होतो. बाल्यावस्थेत तो शिक्षण घेतो, प्रौढावस्थेत या शिक्षणाचा वापर करून अर्थार्जन करतो, समाजोपयोगी कार्ये करतो आणि वृद्धावस्थेत प्रौढावस्थेतील धन व मान-सन्मान या कमाईच्या आधारे मृत्युकडे वाटचाल करतो. वृद्धावस्थेत आपल्या अनुभवाचा वापर तो बालकांना शिक्षण व प्रौढांना मोलाचा सल्ला द्यायला करू शकतो. बालकाचा विकास प्रौढामध्ये करण्यासाठी पालक, शिक्षक व समाज या तीन घटकांचे सुसंवादी प्रयत्न आवश्यक असतात. या तिन्ही घटकांपैकी शिक्षकाची भुमिका विशेष महत्त्वाची असते. या तिन्ही घटकांमधला सुसंवाद अधीक सखोल करण्याचे कार्य शिक्षकाचे असते. या तिन्ही घटकांमधला परस्पर विश्वास या सुसंवादाची खोली ठरवतो. पण सध्याच्या काळात समाजात शिक्षकाविषय़ी बरेच नकारात्मक समज पसरू लागलेत.शिक्षकाच्या ज्ञानाविषयी, शिक्षक म्हणुन त्याच्या योग्यतेविषयी पालक व समाज अविश्वास व्यक्त करताहेत. या सर्व अविश्वासमय वतावरणामूळे शिक्षणाचा मुळ हेतूच हरवत चाललाय.
खरेतर शिक्षण व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवते. त्याला जगण्याला लायक बनवते. जगताना येणा-या समस्यांशी दोन हात करायला शिकवते. हे जर जमले तर उदरनिर्वाह आपोआप होतो. शिकवणारा शिक्षक शिक्षणाचा मुळ हेतू लक्षात घेऊन शिकवत असेल तर तो उत्तम शिक्षक म्हनवून घ्यायला पात्र असतो. असा उत्तम शिक्षक उत्तम विद्यार्थी घडवतो.
शिक्षणविषयक तक्रारींध्ये मोठी तक्रार आहे ती म्हणजे विद्यार्थ्यांचा दर्जा घसरलाय, शिक्षणाचाच दर्जा घसरलाय. इतर तक्रारी अहेत त्या म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानलालसा नाही. नवनिर्मितीची क्षमता कमी आहे, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा नोकरी-व्यवसायात वा समाजात थेट उपयोग होत नाही, शिक्षणाने बेरोजगारी दुर होत नाहीये इत्यादी. जशा तक्रारी जास्त आहेत , तसेच तक्रार करणारेही जास्त आहेत. येथे आठवते ती " हु मुव्ड माय चीझ?" ही कथा. बहुसंख्य तक्रार करणारे चीझ संपत आल्यानंतर निषेध करत, उपाय न शोधता उपासमारीने मरणार्या उंदरासारखे आहेत. फार दुर्मीळ प्रजाती आहे ती दुसर्या उंदराची. समस्येने खचून न जाता नवा मार्ग शोधणारी. याच दुर्लभ प्रजातीचा एक प्रतिनिधी हा लेख लिहितोय.
शिक्षक कोठे चुकले याची चिरफाड करण्याने शिक्षण सुधारणा होणार नाहीत. कारण चुकलंय ते शिक्षण. आग सोमेश्वरी लागली असेल तर उपाय रमेश्वराकडे करण्यासारखा प्रकार सध्या सुरू आहे. जर खरंच शिक्षणाविषयी तळमळ असेल तर शिक्षण कोठे चुकलॆ याचा प्रामाणिक, अभिनिवेशरहित, पुर्वग्रहरहित विचार व्हायला हवाय. आपल्या शिक्षणाचा असा खेळखंडोबा व्हायला कारण आहे ती आपण स्विकारलेली मेकॉलेची शिक्षण पद्धती. गुलाम राष्ट्राचे सांस्कृतिक व मानसीक खच्चीकरण करणा-या या पद्धतीचा विकास इंग्रज राज्यकर्त्यांना या देशावर पिढ्यानुपिढ्या राज्य करता यावे यासाठी केला गेला. देशाचा बौद्धीक विकास या पद्धतीचा हेतू कधी नव्हताच. बौद्धिक विकास घडवयचाच नसल्याने शिक्षकाला स्वबुद्धी वापरण्याची गरजच नव्हती. याचाच अर्थ शिक्षक बुद्धिमान हवा हा निकष कधी नव्हताच. म्हणुन या पद्धतीमुळे शिकवणे हे सोपे काम आहे असा समज बहुसंख्य शिक्षकांनी व इतर लोकांनी करून घेतला.
इंग्रजांनी लादलेल्या या शिक्षण पद्धतीचा मुळ उद्देश्य भारताचा कारभार हाकण्यासाठी पुरेशी लायकी असलेले मनुष्यबळ पुरवणे हाच होता. या खंडप्राय देशावर राज्य करायचे म्हणजे लिहिता वाचता येणार्यांची, हिशोब करू शकणा-र्यांची, आलेल्या आदेशांचा अर्थ लवून काम करू शकणार्यांची गरज होती. मेकॉलेने अशा गुलाम मनोवृत्तीच्या भारतीयांचे कारखाने ही शिक्षण-पद्धती वापरून निर्माण केले. या पद्धतीमध्ये बांधीव पाठ्यक्रम असतो. शिक्षक तो शिकवतो, शिकवल्यानंतर शिकणारा साचेबद्ध परिक्षा देतो. पाठांतरावर आधारीत प्रश्नांची जो अधिक अचुक- पुस्तकी- उत्तरे लिहीतो तो पास होतो. ज्याला पाठांतर व नंतर त्या पाठांतराचे लेखन जमत नाही तो मागे पडतो. कौशल्यविकास या पद्धतीत अपेक्षीत नाही. कारण कारकून वा कामगार जर स्वतंत्र बुद्धिने काम करु लागला तर ते सत्तेला जड जाते. साच्याचे कामगार घडवणारी ही यंत्रणा आपण स्वातंत्र्यानंतरही स्विकारली.
मेकॉलेच्या या पद्धतीत आवश्यक असणारे पाठांतर शिकवायला बुद्धी आवश्यक नसते. याच कारणाने ज्यांचे थोडेफार शिक्षण झाले आहे त्यांना शिक्षकांची नोकरी मिळवणे जड गेले नाही. पाठांतरच शिकवायचे असल्याने एकदा शिक्षक झाल्यावर ज्ञान वर्धनाची गरजच नव्हाती. या शिक्षकांना काम कमी असते त्याबद्ल्यात मोबदला मात्र बरा मिळतो. फावल्या वेळात वा कामाच्या वेळेत सुद्धा इतर व्यवसाय करून वरकमाई करता येते हे समाजाने बरोबर हेरले. मग याच स्वकार्यभाग साधाणार्या पुर्वसुरींच्या पावलांवर पाऊले टाकत डी. एड. करुन शिक्षक होऊन पाट्या टाकणार्यांची फळी तयार झाली. यांनी पाठांतरात तयार केलेले पुढे पदवीधर व त्यांच्यापुढचे द्विपदवीधर झाले. यांच्यातूनच माध्यमीक व महाविद्यालयीन शिक्षक घडले. सगळ्यांचा जोर पाठांतरावर. याच मंडळींनी मग पाठ्यक्रम घडवले. जे शिकवायला सोपे ते पाठ्यक्रमात सामील झाले. यातच व्यावसायीक अभ्यासक्रमांना महत्त्व आले. त्यांच्या प्रवेशासाठी गुणवाता जोखण्याचा मार्ग होता गुणपत्रक. अधिक गुण -प्रवेशाची व उत्तम भविष्याची खात्री. या समीकरणाने गुणांचे कारखाने उघडले ( वाचा लातूर पॅटर्न व कोचींग क्लासेस). कौशल्या विकास येथेच संपला. संकल्पना समजणे मागे पडले. ही आजची पिढी आहे. स्वतंत्र विचार
सलेली पिढी.
यावर उपाय काय? शिक्षक निवड करताना ज्यांच्याकडे स्वतंत्र प्रज्ञा आहे त्यांचीच निवड शिक्षक म्हणुन करा. शिक्षक अत्त्युत्तम असेल तरच तो उत्तम विद्यार्थी घडवतो. म्हणुन त्यांच्या निवडीसाठी पारदर्शक प्रक्रिया विकसित करा. वस्तुनिष्ठ चाळणी परिक्षा जी या भावी शिक्षकांच्या विषयज्ञान, शिकवण्याची व शिकण्याची इच्छा, आकलनक्षमता, शिक्षणप्रक्रियेचे ज्ञान, नवीन शिक्षण पद्धती अवलंबण्याची क्षमता, पडताळले जावे. यानंतर प्रत्यक्ष वर्गावर शिकवायला लावून शिकण्याचे कौशल्या जोखले जावे. या प्रक्रियेमधुन ताऊन सुलाखून बाहेर पडणारे हे शिक्षक संख्येने कमी असतील. असुदेत. कोणत्याही परिवर्तनाचा प्रारंभ असाच मंद असतो. या संख्येने कमी असलेल्या लायक शिक्षकांना शिक्षणाचा मुळ उद्देश शिकवा. कौशल्ये शिकवण्याचे स्वातंत्र्य व सृजनात्मक शिक्षणपद्धती विकसीत करण्यासाठी प्रोत्साहन द्या. हे केल्याबद्दल मान-सन्मान द्या. मग इतरांना त्यांचे अनुकरण करण्याची उर्मी येईल. कौशल्य शिकवणा-या शिक्षकांची संख्या वाढेल. आणि हा बदल कालपरत्वे पुढे झिरपत जाईल.
मुळापासून सुधारणा करणे गरजेचे आहे. फक्त टिका करणे सोपे असते. महाविद्यालयीन विद्यार्थ्याला शिकण्याची द्रुष्टी आलीली असते. पण नसतो तो अनुभव. शिक्षण अमर्याद आहे. यातील काय शिकावे व कसे शिकावे यासाठी प्राध्यापक असतो. तो शिक्षकच असतो. ब-याचदा विद्यार्थी त्याच्यापेक्षा जास्त बुद्धिमान असतात. शिक्षकाकडे जास्त असतो तो अनुभव. विषयातला तर असतोच त्याबरोबर विषायाशी संलग्न पण पुस्तकात नसलेल्या ब-याच संकल्पना त्याला अनुअभवाने उमगलेल्या असतात. विषयाचा वापर जगण्यासाठी कसा अरावा यचे ज्ञान त्याला आलेले असते. यामुळे तो शिकवू शकतो कसे शिकावे? असा प्राध्यापक पाठ्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी त्याच्या मगदुराप्रमाणे हे अमर्याद शिक्षण जितके जास्त परिणाकारकपणे घेता येइल तितके घेतो. त्याने मिळवलेल्या कौशल्यांची प्राध्यापक पडताळणी करतो. त्रूटी दुर करतो. आणखी काय करता येईल याचे जाण देतो. त्याला माहीती असते प्रत्येक विद्यार्थी वेगळा आहे. प्रत्येकाला वेगळ्या मर्गदर्शनाची, वेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करण्याची गरज असते. त्याच्या मार्गदर्शनाखाली य विद्यार्थ्याची उत्क्रांती पुढच्या पिढ्या घडवणार्या शिक्षकामध्ये होते. पाठांतराधारीत परिक्षा या प्रक्रियेला गर्भातच मारतात. प्राध्यापक जिर्ण शिर्ण नोटस मधुन शिकवतो. विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळावेत म्हणुन त्यांना नोट्स झेरॉक्स करून देतो. महत्त्वाचे प्रश्न सांगतो. अभ्यासक्रमाची झापडे लावतो. कायद्यांचा लावावा तसा पाठ्यक्रमाचा शब्द्च्छल करणारा अर्थ लावून तेव्हढेच घटवून घेतो व छापाचे सुबक गणपती घडवतो. हे छापाचे गणपती पदव्यांच्या पुंगळ्या व मेडलं मिरवत, जगण्याच्या बाजारात ठेचकाळायला व प्राध्यापकाला व शिक्षणालाच दोष द्यायला बाहेर पडतात. दोष मुळातून सुधारायला हवेत. पाठांतराधारीत परिक्षा बंद करून कौशल्याधारीत परिक्षा यायला हव्यात.
काही वेळेस साध्या साध्या गोष्टी समजायला अवघड जातात. अनेक शिक्षकांना सुद्धा कौशल्यविकास करायचा म्हणजे काय हे समजत नाही. उष्णतेने घनपदार्थ प्रसरण पावतात व उष्णता काढून घेतली की त्यांचे आकुंचन होते. ही झाली माहिती. एखाद्या भांड्याचे झाकण उघडत नसेल तर भांडे थंड करावे अथवा झाकण तापवावे हे झाले ज्ञान. त्याचा व्यवहारात वापर करून भांडे उघडणे हे झाले कौशल्य. वाचता येणे हे कौशल्य आहे. लिहिता येणे हे कौशल्य आहे. निबंध लिहीणे हे भाषीक कौशल्य आहे. आपण निबंध लेखणाचे काय केले? परिक्षेत गुण मिळावेत म्हणुन आपण निबंध पाठांतर करायला शिकवले. अनेक शिक्षक तर निबंधाच्या पुस्तकातून निबंध उतरवून आणायला सांगतात. काही शिक्षक निबंध फळ्यावर लिहुन देतात. विद्यार्थी त्यांच्या गृहपाठाच्या वहीत( या वहीला कव्हर असावे लागते, अक्षर चांगले असावे लागते, लिहिण्यातला निटनेटकेपण महत्त्वाचा असतो) हा निबंध घरून पक्का लिहून आणतात. तो दोनदा त्यांच्या हाताखालून जातो. तपासताना शिक्षकाला एक नजर टकून तपासता येतो, निबंध पुस्तकातला घेऊन जसाच्या तसा लिहिलेला असल्याने मजकुराची , भाषेची, विचारमांडणीची तपासणी करावी लागत नाही वेळ वाचतो. विद्यार्थ्याला परिक्षेत गुण मिळतात पण निबंधलेखन कौशल्याचे काय? गुणांना महत्त्व दिल्याने शिक्षकाचा भाषीक कौशल्य शिकवण्याचा अवघड खटाटोप वाचला.
गणितात तर आणखीच गंमत आहे. त्रिकोणमीतीचे काय करायचे याचे कोणालाच काही कळत नाही. क्षेत्रफळ काढणे पुस्तकातले वेगळे व व्यवहारातले वेगळे बनून जाते. हे विषय वर्गात शिकवण्याबरोबरच निसर्गात नेऊन शिकवावा लागतो. तोच प्रकार वनस्पती वा प्राणी शास्त्राचा. वनस्पतींचे विविध भाग शिक्षक विद्यार्थ्यांना वर्षातुन एकदा दाखवतो तेही बहुद्धा चित्रांच्या सहाय्याने. तो मुलांना त्याच्या पाहण्यातली उदाहरणे देतच नाही. पुस्तकातल्या बटाट्याचे डोळे पाहून विद्यार्थ्याला काही कळतच नाही. घरी जाऊन बटाटा बघायला कोणी शिकवतच नाही. बटाट्याच्या फोडी मातीत लावून डोळ्यांचे अंकुरणे अनुभवण्याचे तर दूरच. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील. माझ्या एका सहका-याच्या मुलाने " होळी" या विषयावर फळ्यावरचा निबंध न लिहीता स्वतःच्या मनाने लिहिला म्हणुन त्याच्या शिक्षकाने त्याची निबंधवही भर वर्गात फेकुन दिल्याचे आठवते. या विद्यार्थ्यावर काय संस्कार झाले असतील? तो जर संवेदनशील असेल तर आयुष्यभर आता स्वतःचे विचार मांडू शकणार नाही. हे शिक्षकाने क केले असेल तर प्रत्येक मुलाला निबंधाचे गुण मिळावेत म्हणून.
गुणाधारीत मुल्यांकन चुकीचेच आहे. गुण या शब्दाच्या मुळ अर्थाचा विचार व्हावा. विद्यार्थी गुणवंत म्हणजे फक्त मार्क्सने नसावा तर त्याला त्याच्या वयाला अपेक्षीत कौशल्ये आत्मसात असावीत. गुणाधारीत मुल्यांकन बंद करा. कौशल्यांचा विकास व जोपासना करा तरच शिक्षण अर्थपुर्ण होईल. विद्यार्थ्याला शिक्षणाचा खरा फायदा तेव्हाच होईल.
No comments:
Post a Comment