Tuesday, 2 July 2013

मराठा समाजाची शक्तीस्थळे

मराठा समाजाची शक्तीस्थळे…


महाराष्ट्रातील काही, नव्हे अनेक लोकांना महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावी असे मनापासून वाटत असते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे अतिशय अवघड आहे, किंबहुना मराठ्यांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण या गोष्टी केवळ अशक्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मराठा समाज सत्ताधारी आणि शक्तिशाली आहे. त्याची काही शक्तिस्थळे आहेत.काय आहेत ही शक्तिस्थळे?

मराठ्यांची संख्या-
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मराठ्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मतभेद आहेत. खुद्द मराठा समाज आपल्या समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे असे मानतो, तर मराठाविरोधी मानसिकता असणारे लोक ही संख्या फारतर २२ टक्के असावी असे म्हणतात. ते काहीही असले तरी मराठा समाज इतर कुठल्याही समाजापेक्षा संख्येने जास्त आहे ही गोष्ट नक्की आहे. तो किमान ४० टक्के तरी असावा. भारताच्या कोणत्याही राज्यात लोकसंख्येचा एवढा मोठा भाग असणारा दूसरा समाज नसावा. मराठ्यांची ही मोठी संख्या हे त्यांचे सगळ्यात मोठे शक्तिस्थळ आहे.

मराठ्यांचे नेटवर्क-
मराठ्यांचे दुसरे मोठे शक्तीस्थळ म्हणजे त्यांचे जबरदस्त नेटवर्क.नुसते मराठा म्हणून आवाज जरी दिला तरी सकल मराठा समाज एकत्र होतो.मराठा समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, खेड्या-पाड्यांमध्ये मोठ्या संख्येने आहे. हा समाज एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडला गेलेला आहे. या नेटवर्कचे प्रचंड फायदे या समाजाला राजकारणात आणि इतरही क्षेत्रात मिळत असतात. इतर समाज महाराष्ट्रभर पसरलेले नसल्याने त्यांचे ऑल महाराष्ट्र नेटवर्क तयार होवू शकत नाही. ज्यांचे होवू शकते त्यांची संख्या राजकारणाच्या दृष्टीने नगण्य आहे.

मराठ्यांची सत्तेची परंपरा-
मराठा समाजाचे तिसरे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांना असलेली सत्तेची परंपरा. ही परंपरा अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरपासून चालत आली आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाला गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सत्ता सांभाळण्याचा शेकडो वर्षांचा अनुभव मिळाला आहे. अर्थातच या अनुभवाचा फायदा त्यांना मिळत आला आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाकडे सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती आली आहे, नेत्यांकडे संयम, मोजके आणि नेमके बोलणे, धडाडी, लोकसंग्रह करण्याचे वृत्ती यासारखे अनेक गुण आले आहेत.

सहकार चळवळ-
मराठा समाजाचे चौथे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांची सहकार चळवळ. या समाजाने सहकार चळवळ गावोगावी नेली. त्यांनी अनेक सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअर्‍या काढल्या. इतर समाज सहकारी क्षेत्रात मराठ्यांएवढे काम करू शकले नाहीत. याचा राजकीय फायदा मराठा समाजाला नेहमीच होत राहिला.

आज मराठा समाजावर उघडपणे किंवा कुजबूज मोहिमेतून टीका करणार्‍यांची संख्या वाढत चालली आहे. पण त्याचा फारसा कांही उपयोग होणार नाही. कारण मराठ्यांची ही शक्तीस्थळे त्यांना पुढील काळातही राजकीय फायदा देत रहाणार आहेत.

महाराष्ट्रातील कोणताही पक्ष मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. ज्या पक्षात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही, त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहातोच.

No comments:

Post a Comment