विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची जबाबदारी
विद्यार्थ्यांची मानसिकता आणि पालकांची जबाबदारी..
शाळा,
कॉलेज आणि क्लासच्या अभ्यासाचा बोजा, पालकांच्या न पेलवणार्या अपेक्षांचे
ओझे, स्पर्धात्मक परीक्षा त्यासाठी करावी लागणारी सततची धावपळ, वाढते ताणतणाव, त्यातून येणारे वैफल्य, आजार, कौटुंबिक तंटेबखेड..
अशा अनेक समस्यांमुळे १४ ते १९ या वयोगटातील तरुण/तरुणींचे अभ्यासातील लक्ष
कमी होणे, बेछुट वागणे, मित्र/मैत्रिणींच्या आग्रहाला आणि भरकटलेल्या
विचारांना बळी पडून व्यसनाधीनतेकडे वळण्याची वृत्ती, आत्मसंय्यम आणि
आत्मविश्वास ढासळणे असे काहीसे सध्या बघण्यास मिळत आहे. काही दिवसांपूर्वी
वृत्तपत्रांतून नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोने प्रसिद्ध केलेल्या
माहितीच्या आधारे आपल्या देशात गेल्यावर्षी ३०३५ मुलांनी आत्महत्या केली.
त्यातील परीक्षेत नापास झालेली मुलं २८३, फॅमेली प्रोब्लेमने आत्महत्या
केलेली मुलं ३४४, गंभीर आजार बरा न झाल्याने आत्महत्या केलेली मुलं २६२ आणि
प्रेमात अपयश आल्याने आत्महत्या केलेली मुलं २१५. असो.
आठवडयापूर्वी पुण्यामधील दहावी/अकरावीतील
७०० मुला/मुलींनी दारू पिऊन धिंगाणा घातला ही सर्व पालक आणि पाल्यांना
काळीमा फासणारी घटना घडाण्यामागे काही अंशी वरील कारणे असू शकतील पण
भविष्यात अशा घटना घडूच नयेत म्हणून आता काय खबरदारी घेणे आवश्यक आहे?
त्यासाठी काय करायला पाहिजे? ह्या गोष्टींकडे सर्व पालक आणि पाल्यांनी
अंतर्मुख होऊन लौकरात लौकर निर्णय घेणे उचीत ठरेल.
मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांनी ह्या वयात
अशा पार्ट्या कारणे कितपत योग्य? तसेच पालकांनी मुलांना पार्टीला परवांगी
देतांना पुढील गोष्टी विचारात घेणे आवश्यक होते की मुलगा/मुलगी ज्या पार्टी
जात आहेत ती कोणी अॅरेंज केली आहे, त्यांचा पूर्व इतिहास काय आहे? त्याचे
ठिकाण कोठे आहे? किती फी आहे? कुठल्या वेळी आहे? त्यात कुठले
मित्र/मैत्रिणी सहभागी होणार आहेत? याची अगोदरच काळजी घेतली असती तर अशी
पालकांची आणि विद्यार्थ्यांची नाचक्की झाली नसती. पण घडायचे ते घडून
गेल्यावर उगाच सर्व गोष्टींचा काथ्याकुट करण्यात काही उपयोग नाही. त्या
पेक्षा भविष्यात अशा गोष्टी घडणार नाहीत यासाठी पालक आणि पाल्यांनी काय
उपाय योजना आखणे महत्वाचे आहे यावर गांभीर्याने चर्चा करून ते अमलात आणणे
खूप गरजेचे आहे.
मुला/मुलींना ओरडण्यापेक्षा किंवा
घालूनपाडून बोलण्यापेक्षा सद्य स्थितीत धीर देणे, त्यांनां विश्वासात घेणे
आणि त्यांना आत्मनिर्भय करणे गरजेचे आहे. त्यांच्या चुकीच्या कल्पना आणि
वास्तव यात काय फरक आहे हे नीट समजून सांगणे जरुरीचे आहे. आनंद कशात असतो
तो कसा साजरा करावा आणि दुःख पदरी आले किंवा पराभव झाला तर तो कसा पचवायचा
त्यातून धीर न सोडता, निराश न होता मार्ग कसा काढायचा त्यावर पुन्हा विजय
कसा मिळाववा हे समजून सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी आधी पालकांनीही
पाल्यांसमोर स्वत:च्या आचरणाने आणि वर्तनाने चांगला आदर्श ठेवणे गरजेचे
आहे.
पालकच जर आनंद साजरा करण्यासाठी दारूच्या पार्ट्या झोडत असतील आणि दु:ख
विसरण्यासाठी वाईट व्यसनांचा मार्ग अवलंबित असतील किंवा पाल्यांपुढे व्यक्त
करीत असतील तर या सारखे दुर्दैव ते कुठले? आणि यातच पालकांना धन्यता वाटत
असेल तर पाल्यांना एक प्रकारचे चुकीचे प्रोत्साहन दिल्यासारखेच आहे. मग
तरुण/तरुणींची डोकी भडकली तर त्याचा दोष कोणाला द्यायचा? याचा अर्थ असा
नाही की त्यांनी असे गैरवर्तन करावे. प्रत्येकाला कर्म स्वातंत्र्य आहे पण
त्याचा त्यांनी कसा चांगला उपयोग करायचा हे समजावून सांगणे महत्वाचे आहे
आणि त्याची जबाबदारी पालक आणि समाजावर आहे.
प्रथम पालकांची मानसिकता बदलणे गरजेचे
आहे. आई/वडिलांनी मुलांच्या समोर न भांडता एकमेकांचा सम्मान करणे, आब
राखणे, मुलांच्या समोर एकमेकांची उणीदुणी न काढणे फार महत्वाचे आहे. कारण
याच वयात मुले/मुली पालकांचे आचरण आपल्या दैनदिन जीवनात राबवत असतात. खरे
काय, खोटे आणि नकली काय याची वेळीच जाणीव करून देणे नितांत गरजेचे आहे.
वरील घटनेला बहुतांशी पालकांचा पाल्यांशी
असलेल्या संवादाचा अभाव, पालकांचे पाल्यांवर बारकाईने लक्ष नसणे, आपल्या
करियरच्या विचाराने मुलं/मुलीकडे पालकांचा लक्ष द्यायला वेळ नसणे तसेच घरात
काय करतात? मित्र कोण येतात? कॉम्पुटरवर कुठल्या साईट मध्ये रुची आहे?
कुठले गेम आवडतात? पॉकीटमनी कसा आणि कशावर खर्च करतात याचे
त्यांच्याबाबातीतील विचार पडताळून पाहणे आणि अचानक हिशोब मागणे आवश्यक आहे.
मुख्य म्हणजे पालकांनी लहान व कोवळ्या
वयात पाल्यांवर चांगले संस्कार घडवले पाहिजेत. विविध भाषांतील चांगल्या
लेखकांची पुस्तके, संतांची चरित्रे, मार्गदर्शनपर ग्रंथ, कथा, कादंबर्या,
कविता वाचण्याची रुची निमार्ण कारणे गरजेचे आहे. सद्य स्थितीत देश भक्ती
आणि प्रेम जागरूक करणे फार महत्वाचे आहे. थोरामोठ्यांचा आणि गुरुजनांचा आदर
राखण्याचे धडे आपल्या कृतीतून पाल्यांनी आचरणात आणले पाहिजेत. हे संस्कार
त्यांना त्यांच्या आयुष्यभर पुरतील आणि ते पुढच्या पिढीत झिरपले तरच अशा
घटनांना भविष्यात ब्रेक लागेल. माणसांच्या मानसिकतेचा विचार करता कुठलीही
वाईट गोष्ट, व्यसन किंवा दुर्गुण लौकर अंगिकारले जातात कारण त्यांना कष्ट
पडत नाहीत पण चांगले गुण, संस्कार रक्तात भिनायला किंवा मन व बुद्धीला
पटण्यासाठी वेळ लागतो. ते सहजासहजी पटत नाहीत.
No comments:
Post a Comment