Thursday, 28 February 2013

तुम्हीच ठरवा, तुमचे जग कसे असावे?

 तुम्हीच ठरवा, तुमचे जग कसे असावे?

एकदा एक मनुष्य, आपले सारे समान एका बैल गाडीवर लादून एका गावामध्ये प्रवेश करता झाला. त्या गावात प्रवेश केल्यानंतर, तो गाव प्रमुखाकडे गेला व म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या गावांत राहायची परवानगी द्याल काय? त्या गावप्रमुखाने त्याला विचारले, “तू तुझे गाव का सोडून आलास?” त्यावर तो प्रवासी गाव प्रमुखाला म्हणाला, “तो ज्या गावामध्ये राहत होता, तेथे सगळे फसवेगिरी करतात. सगळेच आळशी आहेत. त्यामुळे त्या गावामध्ये व्यवसाय करणे कठीण झाले आहे. कारण त्यांच्याकडून लोक वस्तू तर विकत घेतात, परंतु पैसे काही देत नाहीत व ते नंतर देण्याचा वायदा करतात परंतू ते आपला शब्द मात्र पाळीत नाहीत.”

ह्या त्याच्या म्हणण्यावर, गाव प्रमुख म्हणाले, “या गावात देखील तशीच माणसे आहेत, जी आळशी आहेत व फसवेगीरीही करतात. त्यामुळे त्याने पुढील गावी जाणे बरे.” त्या गावप्रमुखाच्या आजू – बाजूला बसलेली माणसे गाव प्रमुखांच्या ह्या उत्तराने आश्चर्यचकित झालीत. परंतु, त्यांच्या समोर काहीही बोलली मात्र नाहीत.

काही दिवसांनी, पुन्हा त्या गावात असाच एक प्रवासी आला व गावात उतरण्यासाठी गावप्रमुखाकडे विचारणा करू लागला. त्यालाही गावप्रमुखाने पूर्वीप्रमाणे तेच प्रश्न विचारले. “तू तुझे गाव का सोडलेस? त्यावर तो प्रवासी म्हणाला, “त्याचे गाव तर उत्तमच होते. गावातील माणसे देखील प्रामाणिक होती, तसेच कामसू देखील होती. परंतु त्याने गाव सोडायचे हे कारण होते की तो स्वत: कुंभार होता व गावात कुम्भारांची अशी बरीच कुटुंबे होती. त्यासाठी त्याने असा निर्णय घेतला की ज्या गावामध्ये कुंभार नसतील किंवा कमी प्रमाणात असतील, तेथेच जावून आपण आपला व्यवसाय करावा.” त्याचे हे उत्तर ऐकून, गावप्रमुखाने त्याला त्या गावामध्ये राहण्याची परवानगी दिली. कारण त्या गावातील माणसे प्रामाणिक तर होतीच, परंतु आळशी मात्र नव्हती,



तर ती कामसू होती व गावामध्ये कुंभाराची देखील गरज होती.
त्या प्रवाशाने गावप्रमुखाला धन्यवाद दिले व जागेच्या शोधार्थ पुढे निघून गेला. त्याबरोबर गावातील आजू बाजूच्या उपस्थित माणसांनी गावप्रमुखाकडे विचारणा केली की त्यांनी तसे का केले?

त्यावर गावप्रमुखांनी गावक-यांना समजावून सांगितले की, “आपण जे काही असतो, तसेच आपण आपल्या आजू बाजूला असणा-यांमध्ये पाहत असतो. आजू बाजूचे जग तसेच आहे, असेच समजतो. जो माणूस काही दिवसापूर्वी येथे आला होता, तो स्वत:च आळशी आणि अप्रामाणिक होता. कोणतेही योग्य ते प्रयत्न केल्याशिवाय वा जाणल्याशिवाय तो तेच करीत होता, जे इतर सगळे करीत होते. म्हणजेच तो दुस-यांना दोष देत होता, जगाला दोष देत होता. तो पळवाटा काढीत होता. तर जो आता दुसरा माणूस आपल्याकडे आला आहे, त्याला काय करावयाचे आहे, त्याची पूर्ण कल्पना त्याला होती.

आपण प्रत्येकजण ठरवीत असतो की प्रत्येक दिवशी, प्रत्येक क्षणी जीवनामध्ये आपण जबाबदारीने राहावयास हवे की नको. जितकी जास्त जबाबदारी आपण पेलू, तितका जास्त शोध आपण त्या गोष्टीचा घेवू, तेवढेच आपले जीवन जास्त खुलेल. अशाप्रकारे जीवनाला दिल -खुलासपणे सामोरे जाणे, आपल्या गरजा ओळखून त्याप्रमाणे आपली मागणी करणे, दुस-यांना कमी न लेखणे, दुस-यांना दोष न देणे, तसेच आपल्यामध्ये असलेले आपले स्वत:चे दोष ओळखणे, त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करणे ही तत्वे आपण आपल्या जीवनात अंगीकारल्यास आपण आपले ध्येय गाठण्यात निश्चितच यशस्वी होवू.

No comments:

Post a Comment