Tuesday, 21 May 2013

भीक मागून शिकणारा ‘दत्तात्रेय’ उपशिक्षणाधिकारी ‘डॉ. मठपती’ झाला!



भीक मागून शिकणारा ‘दत्तात्रेय’ उपशिक्षणाधिकारी ‘डॉ. मठपती’ झाला! 

फुटकी-तुटकी पाटी, फाटलेले मळके कपडे आणि पोटात भूक. घरी तर खायला काही नाही. अशा बिकट परिस्थितीत कंधार तालुक्यातील पेठवडज येथील दत्तात्रेय शिवलिंग मठपती यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू केला. गावात दारोदारी जाऊन भिक्षा मागायची, त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह.

या अठराविश्वे दारिद्रयावर मात करीत दत्तात्रेय यांनी पीएच. डी. तर मिळवलीच; शिवाय राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन उपशिक्षणाधिकारीपद मिळविले!

तालुक्यातील खेडकरवाडी येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत डॉ. मठपती सध्या शिक्षक म्हणून काम करीत आहेत. त्यांची उपशिक्षणाधिकारीपदी निवड झाली आहे. दत्तात्रेय यांची अत्यंत हलाखीची परिस्थिती. शिवलिंग आप्पा व आई लक्ष्मीबाई, एक भाऊ-बहीण असा परिवार.

शाळेत शिकताना शाळा भरण्यापूर्वी अन् सुटल्यानंतर गावात घरोघरी जाऊन भिक्षा मागायची. त्यावरच रात्री चूल पेटायची. जीवनसंघर्षांचा हा खेळ दत्तात्रेय यांच्या जीवनात पाचवीला पुजलेला. ते आठवीत होते तेव्हाची गोष्ट. एका घरासमोर ते भिक्षा मागण्यासाठी उभे राहिले, पण तेथे त्यांना शिव्या ऐकायला मिळाल्या. त्यांना खूप वाईट वाटले. घरी आले. झोळी फेकून दिली अन् आईला सांगितले, ‘‘मी यापुढे कधीच भीक मागायला जाणार नाही.’’ मग आईने खूप समजावले, याची आठवण सांगून ते म्हणाले, ‘‘पण मी पुन्हा कधीच झोळी घेऊन भीक मागायला गेलो नाही.’’

शाळेत शिकताना वही नसायची. मग आवळे आणायचे. वर्गात मुलांना वहीच्या जोडपानाला एक आवळा द्यायचो, त्यातून पाने गोळा करायचो. त्यापासून वही तयार करून ती वापरायची.. असे अनेक प्रसंग डॉ. दत्तात्रेय सांगतात. दहावीच्या वार्षिक परीक्षेचे शुल्क भरायला पैसे नव्हते. पेठवडज येथे नरहर जोशी सर होते. त्यांनी दत्तात्रेय यांचे शुल्क भरले. ही परीक्षा पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे ते १९८७मध्ये डी. एड. झाले. गरिबी दूर झाली ती १९८८मध्ये शिक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर

सेवेत असतानाच डॉ. मठपती यांनी बी. ए. (१९९३), इतिहासात एम. ए. (१९९५), बी. एड. (१९९९), एम. एड. (२००२) अशा पायऱ्या एकामागून एक लीलया पार केल्या. मागील वर्षी स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात डॉ. विलास कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘शिक्षकांची अशैक्षणिक कामे’ या विषयात पीएच. डी. मिळविली. विद्यावाचस्पती पदवी मिळविणारे ते लोहा तालुक्यातले पहिलेच प्राथमिक शिक्षक आहेत.

शालेय जीवनात नरहर जोशी, गोविंदराव पन्नमवार, लक्ष्मीकांत मोरलवार या गुरुजींनी आपणास घडविले म्हणून या पदापर्यंत आपण येऊ शकलो, अशी कृतज्ञता डॉ. मठपती व्यक्त करतात. उपशिक्षणाधिकारी पदावर निवड झाल्याची आनंदाची बातमी ऐकायला आई-वडील हयात नाहीत, याची हूरहूर त्यांच्या बोलण्यात दिसली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तके वाचली. त्यातून संघर्षमय जीवनाची प्रेरणा मिळाली, तर शिक्षण उपसंचालक गोविंद नांदेड यांचे वेळोवेळी मिळालेल्या मार्गदर्शनामुळेच आपणाला हे यश मिळाले, अशा भावना डॉ. मठपती यांनी व्यक्त केल्या. या प्राथमिक शिक्षकाने मिळविलेले यश गरीब- होतकरू मुलांसाठी प्रेरक आहे.

No comments:

Post a Comment